सोनई (जि. अहमदनगर) : पुण्यातील भूमाता रणरागिणी महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षारक्षक व पोलिसांनी त्यांना रोखले. त्यानंतर दिवसभर शनिशिंगणापूरमध्ये तणावाचे वातावरण होते.महिलांना रोखणाऱ्या सुरक्षारक्षकांनी आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. महिलांनी त्यासाठी पोलीस ठाण्यात ठिय्या दिला; तर आंदोलकांनी ग्रामस्थांची माफी मागावी, यासाठी स्थानिक महिला अडून बसल्या होत्या. या पेचातून मार्ग काढत शिंगणापूर पोलीस ठाण्यात ४ सुरक्षा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. (वार्ताहर)शनिदेवाच्या चौथऱ्याला स्पर्श करून दर्शन घेत असताना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी महिलांना हटकले. मात्र पुरुष भाविक चौथऱ्याला स्पर्श करून दर्शन घेत असताना आम्हालाच अटकाव का? अशी विचारणा महिलांनी केली. रणरागिणी संघटनेच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्यासह प्रियंका जगताप, दुर्गा शुक्रे, पुष्पा कवेडकर यांनी चौथऱ्यावर जाण्याचा प्रयत्न केला. त्यावरून वाद झाला. राज्य सरकारमध्ये एकही सक्षम महिला मंत्री नाही, की जी शिंगणापूरला येऊन आम्हाला न्याय देऊ शकेल. पंकजा मुंडे यांनीही स्वत:चे मत फिरवत महिलांना वाऱ्यावर सोडले आहे. वास्तविक, मुंडे यांनी त्यांच्या बाबांच्या पार्थिवास अग्नी देऊन रूढी आणि प्रथांना फाटा दिला होता. मात्र त्यांना आता महिला व बालकल्याण मंत्री म्हणून पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही, असे तृप्ती देसाई यांनी सांगितले. आम्ही शनिभक्त आहोत. पण आम्हाला येथे वाईट वागणूक मिळाली. आम्ही श्रद्धाळू आहोत. महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांमार्फत का अटकाव केला नाही, असाही प्रश्न आंदोलकांनी केला.
शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाण्याचा महिलांचा प्रयत्न
By admin | Published: December 21, 2015 2:29 AM