ऑनलाइन लोकमत -
विरार, दि. 28 - लोकलमध्ये लांबचा प्रवास करणा-यांची गुंडगिरी तशी लोकल प्रवाशांना नवी नाही. प्रवाशांचे होणारे गट आणि गुडंगिरीमुळे इतरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बसायला जागा न मिळणे, स्टेशनवर उतरु न देणे आणि कोणी विरोध केला तर त्याला प्रवासाचे नियम शिकवणे या त्रासाला अनेकांना सामोरे जावे लागते. अशीच घटना विरार लोकलमध्ये घडली आहे. वसईला जाण्यासाठी चर्चगेट लोकलमध्ये चढलेल्या तरुणीला महिलांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
20 वर्षीय ऋतुजा नाईकला वसईला जायचं होतं. त्यासाठी तिने विरारच्या प्लॅटफॉर्म नंबर 2 वरुन 8.40 ची विरार-चर्चगेट लोकल पडकली. महिलांच्या सेकंड डब्यात तिने प्रवास सुरु केला. मात्र वसई आल्यानंतर जेव्हा तिने उतरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा बाकीच्या महिला प्रवाशांचा पारा चढला. त्यांनी तिला प्रवासाचे नियम सुनावत टोमणे मारण्यास सुरुवात केली.
वसईला उतरायचं असेल तर बोरीवली, अंधेरी आणि वांद्रेपर्यंत असलेल्या लोकलमध्ये चढावं असं सागत तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वसईला उतरण्यासाठी चर्चगेट लोकलच का पकडली, याचा राग धरत महिलांच्या टोळक्याने ऋतुजा नाईकला मारहाण करण्यास सुरुवात केली. ऋतुजा नाईक इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. महिलांच्या टोळक्याने तिचे केस आणि कपडे धरुन मारहाण केली. इतकंच नाही तर महिलांच्या वादानंतर ऋतुलाजा अस्थमाचा अटॅकही आला.
ऋतुजाने वसईला उतरल्यावर रेल्वे पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केली. 'अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋतुजाच्या तक्रारीनंतर महिला पोलिसांची एक टीम बनवण्यात आली आहे. महिलांची ओळख पटल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल', अशी माहिती वसईचे रेल्वे पोलिस निरीक्षक महेश बागवे यांनी दिली आहे. मी त्या महिलांना ओळखू शकेन असं असं ऋतुजाचं म्हणणं आहे. आरोपी महिलांच्या ओळखपरेडसाठी ऋतुजा बुधवारी सकाळी 8.10 वाजता विरार स्टेशनवर पोहोचली होती. मात्र सरकारी दिरंगाईमुळे ती ट्रेन चुकली.
गुरुवारी पोलिसांनी कारवाई करत 4 महिला प्रवाशांना ताब्यात घेतलं आहे. या महिलांची चौकशी सुरु आहे.