सोलापूर : दुष्काळी परिस्थितीत महिला आणि मुलांचे हाल होत आहेत. राज्य सरकारने त्यांच्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
चित्रा वाघ यांनी सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील चारा छावण्यांना भेट दिली. यानंतर राष्ट्रवादी भवनात झालेल्या कार्यक्रमावेळी त्यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधला़ पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, ग्रामीण भागात पाण्याची मोठी टंचाई आहे. डोक्यावर आणि कमरेवर पाण्याच्या घागरी, हंडे वाहिल्याने ग्रामीण भागातील महिलांना गर्भपात, कमरेच्या विकारासह अनेक प्रकारचे आजार जडत आहेत. अनेक छावण्यांवर महिलांना मुक्काम करावा लागत आहे. त्यांच्या मागे मुलांची हेळसांड होत आहे. या गोष्टी लक्षात घेऊन सरकारने बालगृहे सुरू करायला हवीत. महिलांसाठी शाश्वत रोजगार हमी योजना सुरू करायला हवी. ५० वर्षांवरील शारीरिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या ग्रामस्थांसाठी अनुदान द्यायला हवे.
अनेक महिलांनी शेळ्या, मेंढ्या यांच्या चाºयासाठी अनुदान देण्याची मागणी केली आहे. ही बाब दुर्लक्ष करण्यासारखी नाही. दुष्काळाच्या काळात लोक वैतागलेले आहेत. सरकारला जाग आणण्यासाठी या सर्व मागण्यांचे निवेदन सरकारपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जयमाला गायकवाड, निर्मला बावीकर, कविता म्हेत्रे आदी उपस्थित होत्या.
जनावरांना, माणसांना एकसारखे पाणीचित्रा वाघ यांनी छावण्यांमधील विदारक परिस्थिती कथन केली. छावण्यांवर जनावरांसाठी उपलब्ध असलेले पाणी माणसांना पिण्यासाठी वापरावे लागत आहे. जनावरांना उसाचा चारा दिला जातोय. एकच प्रकारचा चारा खाऊन जनावरांच्या तोंडाला फेस येतोय. घरदार सोडून लोक जनावरांसाठी छावण्यांवर आले आहेत. सरकारने केवळ पाच जनावरांना चारा मिळेल, अशी अट घातली आहे. त्याचाही त्रास अनेक शेतकºयांना होतोय. मुख्यमंत्री एसीमध्ये बसून दुष्काळाचे नियोजन करीत आहेत. हे सरकार इलेक्शन मूडमधून बाहेर आलेले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.