ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - ‘गिर्यारोहण आणि महिला’ ही यंदाच्या गिरिमित्र संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना असून महिला गिर्यारोहकांचा सन्मान करण्यात येणार आहे. यासंदर्भातलं गिरीमित्र संमेलनांचं आवाहन आयोजकांच्याच शब्दांत...
नमस्कार गिरिमित्रांनो,
आपण सारेचजण डोंगर किल्ल्यांवर मनमुराद भटकणारी माणसं! आपल्या डोंगरभटक्यांच्या जगात स्त्री-पुरुष असा हा भेदभाव नाहीच. पण तरीदेखील काहीशा उशिरा का होईना पण या डोंगरभटक्यांच्या जगात महिलांचा प्रवेश झाला आणि तिथं त्यांनी आपलं एक स्थान निर्माण केलं. ऐंशी-नव्वदच्या दशकात कित्येक महिलांनी, मुलींनी घरच्यांचा रोष पत्करुन आधी उस्तुकतेपोटी, नंतर आवड किंवा छंद म्हणून अनेक डोंगरवाटा पालथ्या घातल्या आणि त्यानंतर एक ध्यास म्हणून गिर्यारोहणात आपला ठसा उमटवला. हेच सारं डोळ्यासमोर ठेवून आपण १५ वे गिरिमित्र संमेलन घेऊन येत आहोत. ‘गिर्यारोहण आणि महिला’ ही यंदाच्या गिरिमित्र संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. १९७२ पासून गिर्यारोहण क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या चंद्रप्रभा ऐतवाल ते अगदी कालपरवाच्या पूर्णा मालवथपर्यंत अनेक नामवंत महिला गिर्यारोहक संमेलनास उपस्थित राहतील. विशेष म्हणजे या वर्षीच्या संमेलनाच्या आयोजनाची बहुतांश जबाबदारी प्रामुख्याने महिलांच्याच खांद्यावर असेल.
देशात महिला गिर्यारोहणाचा पाया ज्यांनी रचला त्या पद्मश्री चंद्रप्रभा ऐतवाल संमेलनाच्या अध्यक्षपदी असणार आहेत. तर संमेलनाच्या उद्घाटक असतील एव्हरेस्टवर दोन वेळा आरोहण करणाऱ्या पहिल्या महिला गिर्यारोहक पद्मश्री संतोष यादव. पोलीस दलात आपल्या कार्यकर्तुत्त्वाने स्वत:चा वेगळा ठसा उमटविणाºया ठाणे पोलिस उपायुक्त (वाहतूक) डॉ. रश्मी कंरदीकर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. अंशु जामसेनपा, सुमन कुटीयाल आणि मालवथ पूर्णा या तिनही एव्हरेस्टवीर महिला विशेष अतिथी असतील. आजवर तीन वेळा एव्हरेस्टवर यशस्वी आरोहण केलेल्या अंशु जामसेनपा यांनी त्यापैकी दोन आरोहणं तर एकाच मोसमात, केवळ दहा दिवसांच्या कालावधीत केली आहेत. पूर्णा मालवथ हीने वयाच्या तेराव्या वर्षीच एव्हरेस्टवर आरोहण करुन सर्वात कमी वयात एव्हरेस्टवीर होण्याचा विक्रम केला आहे. या सर्वांची संमेलनातील उपस्थित महाराष्ट्रातील गिर्यारोहण क्षेत्राच्या अनुषंगाने नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
पाहुण्या गिर्यारोहकांच्या मोहिमांचे अनुभव हे त्यांच्या सादरीकरणातून, तसेच थेट संवादातून उलगडणार आहेत. पण त्याचबरोबर राज्य आणि देशपातळीवरील महिलांच्या गिर्यारोहण कर्तुत्त्वाचा आढवा देखील आपण घेणार आहोत. महाराष्ट्रात या खेळाचा विकास झाला तो संस्थांच्या पातळीवर. ९० च्या दशकातील अनेक संस्थांमधील महिला आजदेखील कार्यरत आहेत. केवळ एव्हरेस्टचा ध्यास न घेता गेली तीसचाळीस वर्षे या महिलांचं संस्थात्मक योगदान महत्त्वाचं आहे. या सर्व घडामोडींचा आढावा संमेलनात घेण्यात येणार आहे. यानिमित्ताने महिलांचा गिर्यारोहणातील सहभाग, त्यांची वाटचाल आणि सद्यास्थिती असा सर्वांगीण आढावा घेतला जाईल. एकूणच आजच्या काळातील महिलांचा या क्रिडा प्रकाराकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि भविष्यातील वाटचालींवर यानिमित्ताने प्रकाश तर टाकता येईलच, पण त्याचबरोबर या विषयाचे दस्तावेजीकरणदेखील त्यातून घडणार आहे. दिनांक ९ व १० जुलै रोजी होणाऱ्या या दिड दिवसाच्या कार्यक्रमात महिला गिर्यारोहकांच्या अनुभवाचा आनंद दृकश्राव्य सादरीकरणातून मिळणार आहेच, पण त्यांच्याशी खुला संवाददेखील साधता येईल.
सविस्तर माहिती girimitra.org या वेबसाईटवर देण्यात आली आहे.