ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. 24 : भेटी गाठी-स्वच्छतेसाठी या मोहिमेत महिलांनाही सामावून घेत, त्यांच्याच हस्ते शौचालय बांधकामाचे भूमिपूजन करण्याचा अनोखा उपक्रम जिल्हा परिषदेने सुरू केला. या मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी बिटोडा भोयर येथे ८ शौचालय बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
गावातील हगणदरी ही गावाला असलेला कलंक असुन हा कलंक कायमचा पुसून टाकण्यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत बिटोडा भोयर या गावातील शौचालय नसलेल्या कुटुंबांच्या भेटी घेऊन शौचालय बांधण्याचे आवाहन केले. आवाहनाला प्रतिसाद देत ३० ते ४० कुटुंबांनी शौचालय बांधकामाचे भुमिपुजन करुन आठ दिवसात शौचालय बांधण्याचे आश्वासन दिले.
गावातील शौचालय नसलेल्या कुटुंबांची माहिती घेतली असता, अनेक प्रतिष्ठित व धनाढ्य लोकांकडेही शौचालय नसल्याचे समोर आले. ही बाब धक्कादायक असून, गावातील या प्रतिष्ठित लोकांनी आधी शौचालय बांधून इतरांसमोर आदर्श निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे उपाध्यक्ष ठाकरे म्हणाले. एका महिन्यात गाव १०० टक्के हगणदरीमुक्त करण्याचे आश्वासन महिला व गावकऱ्यांनी दिले.