परळी : श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा फेरा देवालाही चुकला नाही. पाऊस पडावा म्हणून एरवी देवाकडे करुणा भाकणारे भाविक जेव्हा ज्योतिर्लिंगावरच्या चांदीवर दुष्काळाचे खापर फोडतात, तेव्हा त्याला काय म्हणावे? वैद्यनाथांच्या पिंंडीवरील चांदीच्या आवरणामुळे सध्या पाऊस पडत नाही. त्यामुळे हे आवरणच काढून टाकावे, या मागणीसाठी सोमवारी महिला आक्रमक झाल्या होत्या.देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या पिंडीची झीज थांबविण्यासाठी देवस्थान ट्र्स्टने २०११पासून हे चांदीचे आवरण चढविलेले आहे. हे आवरण काढून टाकावे, अशी मागणी करणारे निवेदन श्री प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग विकास कृती समितीच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले. आवरणामुळे पाऊस पडत नसल्याची महिलांची धारणा आहे. याच मागणीसाठी सोमवारी शांता राठोड यांच्यासह १३ महिला सकाळी ६ वाजता गाभाऱ्यात पोहचल्या. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवले. त्यानंतर मंदिर परिसरात त्यांनी ठिय्या दिला. परळी शहर पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. त्यामुळे तणाव निवळला. (प्रतिनिधी)चांदीचे आवरण कशासाठी?श्री वैद्यनाथाला अभिषेक करीत असताना भक्त मोठ्या श्रद्धेने पंचामृत (दही-दूध-तूप-मध-साखर), हळद-कुंकू, गुलाल बुक्का, अक्षता, अत्तर, केळी, आंबा हीफळे आणि जल या वस्तूंचा वापर यात होतो. आम्लीय पदार्थांच्या गुणधर्मामुळे मूर्तीवर परिणाम होऊन झीज होत असते. ही बाब ट्रस्टच्या लक्षात आल्यानंतरयावर उपाययोजना म्हणून २०११मध्ये चांदीचे आवरण घालून स्पर्शदर्शन अबाधित ठेवले आहे. जगद्गुरूंनीही केले कौतुककाशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर महास्वामी, श्रीशैल्य जगद्गुरु महास्वामी, उज्जैनपीठाचे जगद्गुरू सिध्दलिंंगराज देशीकेंद्र महास्वामी, करवीरपीठाचे शंकराचार्य, राजस्थानचे राधाकृष्ण महाराज यांच्यासह देशातील विविध पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पर्श दर्शन अबाधित ठेवून आवरण केल्याबद्दल व देवाची झीज होऊ नये म्हणून घेतलेल्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केल्याचे ट्रस्टीच्या वतीने निवेदनात म्हटले आहे.चांदीचे आवरण व पावसाचा दुरान्वये संबंध नाही. पाऊस नसण्यामागची शास्त्रीय कारणे वेगळी आहेत. त्याचा पिंडीवरच्या आवरणाशी संबंध जोडता येणार नाही. आवरण असावे की नसावे, हा श्रद्धेचा व ट्र्स्टसंबंधित प्रश्न आहे; परंतु पाऊस कमी असणे किंवा नसण्यामागची नेमकी कारणे आपण लक्षात घेतली पाहिजेत.- प्राचार्या सविता शेटे, राज्य सचिव, राष्ट्रीय अनुसंधान
वैद्यनाथाच्या पिंंडीवरील आवरण काढण्यासाठी महिलांचे आंदोलन
By admin | Published: July 05, 2016 1:50 AM