मुंबई : मुंबई उपनगरीय लोकलमधून प्रवास करताना महिला प्रवाशांवर चोरीच्या उद्देशाने किंवा अन्य कारणाने हल्ले होतात. गेल्या काही वर्षांपासून घडलेल्या अनेक घटनांमुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यानंतर, महिला डब्यात सीसीटीव्ही बसवण्यास सुरुवात करण्यात आली, परंतु यानंतरही पुढचे पाऊल उचलत, आता आणीबाणीच्या परिस्थितीत तत्काळ मदत मिळावी, यासाठी महिला डब्यात ‘टॉक बॅक’ प्रणाली बसवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. यावर काम सुरू असून, अशा दोन लोकल साधारपणे नव्या वर्षातील मार्च महिन्यांत दाखल होतील. यातून महिला प्रवाशांना गार्डशी संवाद साधता येईल. महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर, पश्चिम आणि मध्य रेल्वेने लोकलमधील महिला डब्यात सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेतला. यात मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रत्येकी ५0 डब्यात सीसीटीव्ही बसवण्यास सुरुवात केली. पश्चिम रेल्वेवर आतापर्यंत ५0 डब्यांपैकी २१ डब्यात म्हणजेच, सात लोकलमध्ये सीसीटीव्ही बसविले आहेत, तर मध्य रेल्वेकडूनही यावर काम सुरू आहे. त्याचप्रमाणे, मध्य रेल्वेने महिला डब्यात पॅनिक बटण नावाची प्रणालीही बसवली. यात आणीबाणीच्या परिस्थितीत हे बटन दाबताच त्याची माहिती गार्डला मिळत होती आणि त्याच्या सहाय्याने गार्ड व पोलीस डब्याजवळ पोहोचून मदत देऊ शकत होते. मात्र, या प्रणालीचा गैरवापर होत असल्याने, ही यंत्रणा मध्य रेल्वेकडून बंद करण्यात आली. आता यानंतर, पश्चिम रेल्वेने आणखी एक पाऊल पुढे टाकत महिलांच्या डब्यात ‘टॉक बॅक’प्रणाली बसवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या धावत असलेल्या मुंबई मेट्रोमध्ये अशा प्रकारची यंत्रणा आहे. यामध्ये प्रत्येक महिला डब्यातील दरवाजाजवळ बटण बसवण्यात येईल आणि ते बटण दाबताच तेथे असणाऱ्या छोट्या माइकद्वारे लोकलमधील मागच्या डब्यात असणाऱ्या गार्डशी संवाद साधता येईल. त्यामुळे अणीबाणीच्या परिस्थीतीत महिला प्रवासी गार्डशी संवाद साधू शकतील. दोन लोकलमधील महिला डब्यात ही प्रणाली बसवण्यात येत आहे. महालक्ष्मी येथील कारशेडमध्ये यावर काम सुरू असून, जवळपास २५ लाख रुपये खर्च आहे. हे काम फेब्रुवारी महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट संबंधित कंपनीला देण्यात आले आहे. त्यानंतर, ही प्रणाली असलेल्या लोकल दाखल होतील.
महिलांची सुरक्षा आता ‘लोकल गार्ड’च्या हाती
By admin | Published: December 22, 2016 4:28 AM