अहमदनगर : कोपर्डीतील अत्याचार प्रकरणातील आरोपी संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांच्यावर सोमवारी जिल्हा न्यायालयात संतप्त महिलांनी चप्पलफेक करत मारहाण केली. धक्काबुक्कीत महिला पोलीस जखमी झाल्या. पोलिसांनी पाच महिलांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ न्यायालयीन सुनावणीनंतर आरोपींना नेत असताना शिवसेनेच्या माजी पदाधिकारी स्मिता अष्टेकर यांच्यासह पाच ते सहा महिलांनी आरोपींच्या दिशेने चप्पल भिरकावली. आरोपींना मारहाण करत त्यांना वाहनाबाहेर ओढण्याचा प्रयत्न केला़ न्यायालयाने आरोपींच्या कोठडीत ३० जुलैपर्यंत वाढ केली आहे़ दरम्यान, लोकांमध्ये कायद्याचा धाक राहिलेला नाही. त्यामुळे अत्याचार करणाऱ्यांचे जागेवरच हातपाय छाटले पाहिजेत, अशी संतप्त भावना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. ठाकरे यांनी कोपर्डीला भेट देऊन पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्याचे काही ग्रामस्थांनी त्यांना सांगितले. त्यावर कायद्याचा गैरवापर होत असल्यास त्याला सरकारने पर्याय शोधला पाहिजे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)पौडवालही संतापल्या- बलात्काऱ्यांना ते दिसतील तेथेच फोडून काढा, अशी संतप्त भावना ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. - कोपर्डीतील मुलींसाठी भैय्यूजी महाराज यांच्या इंदूर येथील श्री सद्गुरू दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्टतर्फे सूर्योदय कुहू कन्याधन सुरक्षा योजनेअंतर्गत चार स्कूलबस सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. - कोपर्डी व बीड जिल्ह्यात प्रत्येकी दोन बस सुरु होतील. मुलींच्या समुपदेशनासाठी ११ सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्याचे अध्यक्षपद पीडित मुलीच्या आईला देण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
कोपर्डीच्या आरोपींवर महिलांची चप्पलफेक
By admin | Published: July 26, 2016 5:42 AM