नागपूर : दहन घाटांवर लाकूड पुरवठा करण्यात घोटाळा झाल्याचा मुद्दा महापालिका सभागृहात चांगलाच गाजला. अंकेक्षण अहवालात घोटाळ्याचा पर्दाफाश झाला असताना कंत्राटदाराला का वाचविले जात आहे, असा सवाल करीत कंत्राटदारावर त्वरित गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्याची मागणी करीत विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी महापालिका सभागृहाचे कामकाज रोखून धरले. संतप्त विरोधकांनी अंकेक्षण अहवालाच्या प्रती फाडून महापौरांच्या आसनाकडे भिरकावल्या. महापौरांचा माइक हिसकावण्याचा प्रयत्न केला. सभागृहात एकच गदारोळ झाला. शेवटी महापौर प्रवीण दटके यांनी अंकेक्षण अहवालाच्या आधारावर गुन्हे दाखल करता येतात का, याबाबत आठ दिवसांत कायदेतज्ज्ञांचे मत घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र महापौरांच्या या निर्णयावर काँग्रेस, राष्ट्रवादी व बसपाच्या नगरसेवकांनी नाराजी दर्शविली. संतप्त विरोधकांनी महापौरांच्या आसनासमोर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली.
दहन घाटांवर लाकूड घोटाळा
By admin | Published: December 06, 2014 2:34 AM