मुंबई: केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरु असलेल्या कारवाईवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. 'ईडी, सीबीआय, एनसीबी आणि इतर तपास यंत्रणांसह किरीट सोमय्यांनाही जम्मू-काश्मीरमध्ये पाठवा, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला होता. राऊतांच्या त्या टीकेला आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'सर्वज्ञानी संजय राऊतांच्या बोलण्यातून चोराच्या मनात चांदणं दिसतंय', असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला.
चित्रा वाघ यांनी ट्विटरुन टीका करताना म्हटले की, 'महाविकास आघाडी सरकारला आयटी आणि ईडीची भीती वाटते. सर्वज्ञानी संजय राऊतांच्या बोलण्यातून चोराच्या मनांत चांदणं दिसतंय. केंद्रीय यंत्रणांनी जनतेला लुटणाऱ्या टोळी विरोधात सर्जिकल स्ट्राईक सुरू केला.हे अलीबाबा अन् ४० चोरांचं सरकार...चोरांना व त्यांच्या सरदारांना हिशोब द्यावाच लागेल,' असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं.
याशिवाय, दुसऱ्या एका ट्वीटमध्ये चित्रा वाघ म्हणतात की, 'सर्वज्ञानी संजय राऊतांचा संताप समजू शकते..चुकवलेले लाखों रूपये मागच्या दारानं लपत छपत पुन्हा जमा करावे लागले...याचाच अर्थ केंद्रीय यंत्रणा योग्य मार्गावर आहे. आता आदळआपट करून उपयोग नाही..जैसी करणी, वैसी भरणी,'असा टोलाही चित्रा वाघ यांनी लगावला.
काय म्हणाले संजय राऊत ?ईडी, सीबीआय आणि एनसीबीला जम्मू-काश्मीरमध्ये पाठवा, खूप शक्तिशाली लोक आहेत, दहशतवादी पळून जातील. तुम्ही इथे आमच्या सरकारवर केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून हल्ले करत आहात. तुम्ही या संस्था बदनाम केल्या आहेत. किरीट सोमय्यांना काश्मीरमध्ये पाठवा. फिरू द्या त्यांना जम्मू, काश्मीर, अनंतनाग आणि बारामुल्लामध्ये. दहशतवाद्यांची कागदपत्रे आम्ही त्यांना देऊ. जम्मू काश्मीर फिरत बसतील, असा संताप संजय राऊत यांनी यंत्रणांच्या कारवाईसंदर्भात बोलताना व्यक्त केला.