ऑनलाइन लोकमत
चंद्रपूर, दि. २ - चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यातील आरोग्य सुविधांचा दर्जात्मक विकास करतांना या दोन्ही जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांचे काम वेगाने पूर्ण करावे, कोणत्या वर्षी कोणत्या महिन्यात या दोन्ही महाविद्यालयांचे उदघाटन करता येईल याचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून तो आपणास सादर करावा असे निर्देश वित्तमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.यासंबंधी विधानभवनात आायेजित केलेल्या बैठकीस आ. नाना शामकुळे, आ. गोपालदास अग्रवाल, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिणगारे यांच्यासह चंद्रपूर आणि गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.हे दोन्ही जिल्हे नक्षलग्रस्त असून आदिवासी बहूल जिल्हे आहेत. या भागाचा मानव विकास निर्देशांक ही खुप कमी असल्याचे सांगून वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, या रुग्णालयातील सध्या आरोग्य विभागात कार्यरत असलेले जे वर्ग चार ते वर्ग एक चे कर्मचारी वैद्यकीय शिक्षण विभागात समायोजित होऊ इच्छितात त्यांना यासंबंधीचा पर्याय दिला जावा व त्यांच्या होकारानंतर ही पदे वैद्यकीय शिक्षण विभागात समायोजित केली जावीत. धुळे, अंबाजोगाई सारख्या ग्रामीण भागात ५० टक्के दराने व्यवसायरोध भत्ता दिला जातो तो चंद्रपूर व गोंदियामधील अधिष्ठता व अध्यापकांन मिळावा यादृष्टीने प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याच्या सूचना ही वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.