लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रिव्हर मार्चचे नदी संवर्धनाचे काम कौतुकास्पद असून, या कामामुळे नद्या वेगाने वाहू लागतील, असा विश्वास व्यक्त करत नद्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिव्हर मार्चच्या सदस्यांना दिले.मुंबईतील मिठी, ओशिवरा, पोईसर आणि दहिसर नद्यांच्या संवर्धनासाठी रिव्हर मार्चने पुढाकार घेतला आहे. दहिसर आणि पोईसर नदीच्या स्वच्छतेचे काम हाती घेऊन नद्यांचे संवर्धन उत्तमरीत्या रिव्हर मार्च करत आहे, तसेच मागील काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी रिव्हर मार्चने केलेल्या कामाचा आढावा घेतला होता. रिव्हर मार्चच्या सदस्यांनी या प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री बोलत होते.नद्यांच्या उगम स्थानी होणाऱ्या अतिक्रमणाची कोणतेही प्रशासन जबाबदारी घेत नाही. पर्यावरण मंत्रालय, एमसीजीएम, म्हाडा आणि एमएमआरडीए यांनी लक्ष दिले पाहिजे. संयुक्त निर्णय न्यायालयात सादर करण्यासाठी पीएपी (प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल) प्रक्रियेला गती देण्यासाठी एक प्रस्ताव तयार केला जाईल. नदीच्या काठावर आणि समुद्री किनाऱ्यावर काँक्रिटीकरणाचे संकट भेडसावत आहे. ही एक गंभीर समस्या निर्माण होत आहे, असे अनेक मुद्दे सदस्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. या वेळी सदस्यांनी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील पर्याय सांगितले. त्यात गॅबोन भिंतींचा (दगडी भिंत) देखील वापर नद्यांमध्ये केला पाहिजे. सध्या नवीन विकासाची कामे होत आहेत. त्यासाठी सिव्हीएस ट्रीटमेंट प्लॅनद्वारे करण्यात आले पाहिजे, असे सदस्यांनी सांगितले.नद्यामध्ये सांडपाणी सोडले जाते. त्यावरदेखील प्रक्रिया करून मग ते पाणी नदीमध्ये सोडले पाहिजे. धोबीघाट येथील वरच्या भागात लोकांची वस्ती आहे. तिथून येणारे पाण्याचे एसटीपीद्वारे तपासणी करून, मग हे पाणी इथल्या लोकांना कपडे धुण्यासाठी दिले गेले पाहिजे. कपडे धुतल्यावर जे पाणी येईल, त्यावरदेखील प्रक्रिया करून मग ते पाणी नदीमध्ये सोडले जावे, असे म्हणणे सदस्यांनी मांडले. यावर सकारात्मक तोडगा काढू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. डिसेंबर महिन्यात दहिसर नदीच्या पात्रात मृत प्राण्यांचे अवशेष आढळले. या प्रकरणी काहीच कारवाई करण्यात आली नव्हती. नद्यामध्ये मृत प्राणी टाकणे हे चुकीचे आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे, हा मुद्दा सदस्यांनी बैठकीत मांडला.प्लॅस्टिकच्या चहा कपावर बंदी घालानद्या तुंबणे याला एक कारण म्हणजे प्लॅस्टिक कचरा. प्लॅस्टिकच्या चहाच्या कपावर बंदी घालण्यात यावी, ही मागणी मुख्यमंत्र्याकडे करण्यात आली. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, प्लॅस्टिकचे कप त्वरित बंद होणार नाही तर त्यासाठी आपल्याला त्यांना पर्यायी कागदी कपांचा वापर करण्यास सांगितले पाहिजे, पण कागदी कप हे प्लॅस्टिक कपापेक्षा महाग असल्याने सहसा कोणी घेणार नाही. तर त्याच्या किमतीतदेखील बदल करणे गरजेचे आहे.मुंबईतून ४ हजार ट्रक माती वाहून नेली जाते. डेब्रिजवर प्रक्रिया करून त्याचा उपयोग केला पाहिजे. डेब्रिज तिवरांच्या जंगलात टाकले जाते. परिणामी, तिवरांच्या जंगलांना हानी पोहोचते. यावरदेखील तोडगा काढण्यात यावा, असे म्हणणेही बैठकीत सदस्यांनी मांडले.
नद्यांच्या संवर्धनासाठी काम करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 2:59 AM