नितीन गव्हाळे, अकोलाशिक्षणाशी दूरवरूनही संबंध नसलेल्या अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगा. हलाखीची, बिकट हे शब्दही त्याच्या परिस्थितीचे वर्णन करण्यासाठी अपुरे. लोकांच्या अक्षरश: चपला-जोडे शिवून, बूटपॉलिश करून या मुलाने आभाळाएवढे यश मिळविले. बूटपॉलिश करणारा हा मुलगा पाहता पाहता वकील झाला. आता त्याने वकिलीची प्रॅक्टिस सुद्धा सुरू केली. ही किमया घडली ‘लोकमत’च्या पुढाकारातून. ‘लोकमत’ने समाजाला साद घातली आणि या मुलाला समाजाने पाठबळ दिले. या पाठबळावरच या मुलाच्या जीवनाला निर्णायक दिशा मिळाली. शेषराव गव्हाळे त्याचे नाव. आठवीत असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले आणि कुटुंबाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली. लोकांच्या चपला-जोडे शिवता शिवता स्वत:च्या आयुष्यालाही तो ठिगळ लावू लागला. अशा परिस्थितीतही त्याने दहावीत ६0 टक्के गुण मिळविले. दिवसभर काम करूनही पुरेसे पैसे मिळत नसे. आईला सरांकडे जात असल्याचे सांगून शेषराव रात्री रेल्वे स्टेशनवर जायचा आणि बूटपॉलिश करायचा. ५ जून २००९ रोजी बारावीचा निकाल लागला. विद्यार्थ्यांसाठी हा निकाल कौतुकाचा आणि आनंदाचा होता. शेषराव मात्र रस्त्यावर बूटपॉलिश करीत होता. शेषराव ५७ टक्क्यांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला; पण त्याचे त्याला अप्रूप नव्हते. आपण बारावीच काय, पदवीधरही झालो तरी आयुष्यभर संघर्षाचे जिणे जगावेच लागणार, असे त्याचे मत होते. या संघर्षात शिक्षण हरवू न देणाऱ्या शेषरावच्या जिद्दीची गाथा ‘लोकमत’ने वाचकांसमोर आणली. गुणवत्ता यादीत झळकलेल्या एखाद्या विद्यार्थ्याचे झाले नसते तेवढे कौतुक शेषरावचे झाले. समाजाचे पाठबळ मिळाले. शेषरावच्या आकांक्षाचे क्षितिज उंचावले. अमरावती विद्यापीठाच्या विद्वत परिषदेचे सदस्य प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांनी शेषरावची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. ते त्याला खामगावला घेऊन गेले. तेथील श्रीरामभाऊ शेळके विधी महाविद्यालयात शेषरावने प्रवेश घेतला. आज शेषरावचे वकील होण्याचे स्वप्न साकार झाले.
परिश्रमाने केले त्याच्या आयुष्याचे चीज
By admin | Published: July 07, 2014 3:38 AM