लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यभर कोरोनाचा संसर्ग वाढत असून, पोलीस दलातील कर्मचारीही बाधित होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने महाराष्ट्रातील पोलिसांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस दलातील ५५ वर्षांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हा नियम लागू करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत फ्रंटलाईन वर्कर्स मोठ्या प्रमाणावर कोविडच्या कचाट्यात सापडत असल्याचे चित्र आहे. मुंबईत गेल्या २४ तासात तब्बल ७१ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून, पोलीस दलातील सक्रिय रुग्णसंख्या आता २६५ वर पोहोचली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पोलिसांना २४ तास कामावर रुजू व्हावे लागत आहे.
गृह विभागाने याची गंभीर दखल घेत पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनादेखील वर्क फ्रॉम होम ही पद्धत सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात दिलीप वळसे पाटील म्हणाले की, कोरोनाचा वाढता धोका पाहता पोलिसांच्या संरक्षणासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार ५५ वर्षांवरील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम लागू करण्यात आले आहे. त्यांनी कामावर न येता घरुनच काम करायचे आहे.