नागपूर - मुंबई - नागपूर शहराला जोडणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ७०१ किमीचा २४ जिल्ह्यातून जात असून तो १६ पॅकेजेसमध्ये विभागलेला आहे. त्यातील, वर्धा येथे पॅकेज- २ चं काम प्रकल्प कालावधी आधीच पूर्ण करण्यात आले आहे. अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने पेव्हमेंट क्वालिटी कॉंक्रिट (PQC) पूर्ण करणारी पहिली कंपंनी ठरली आहे. पॅकेज-१४ मध्ये इगतपुरी येथील दुहेरी बोगदे दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत पूर्ण केले आहेत.
वर्धा येथील खडकी आमगाव ते पिंपळगाव या ५८.४ किमी या पॅकेज २ चे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. या पट्ट्यात १० दशलक्ष क्यूबिक मीटर ओपन टेकडी कटिंग, दोन वन्यजीव उन्नत मार्ग, एक रोटरी आणि दोन इंटरचेंज, १८ दशलक्ष क्यूबिक मीटर मातीकाम, छोटे आणि मोठे पुल आणि असंख्य स्टील स्ट्रक्चर्सची उभारणी या कामांचा समावेश पॅकेज दोन मध्ये आहे.
अॅफकॉन्सचे पॅकेज 2 चे प्रकल्प नियंत्रक कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, आम्हाला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या चांगल्या पाठिंब्यामुळे आम्हाला कोविड महामारी असतानाही अंमलबजावणीची गती वाढवता आली. आम्ही प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भूकामासाठी एक उत्कृष्ट टीम तयार केली होती. तसेच, भारतातील सर्वात मोठा वन्यजीव उन्नत मार्ग बांधला. बांधकामादरम्यान कोणत्याही प्राण्याला इजा होणार नाही याची काळजी घेतली गेली कारण यामध्ये ड्रिलिंग आणि ब्लास्टिंगचा समावेश होता. आम्ही दोन्ही बाजू बॅरिकेड केल्या आणि सुरक्षिततेची योग्य खबरदारी घेतली असं प्रकल्प व्यवस्थापक अभिजीत चक्रवर्ती यांनी सांगितले.
समृद्धी महामार्ग पॅकेज - 2 ची महत्त्वपूर्ण माहिती व ठळक वैशिष्ट्ये • खडकी आमगाव ते वर्धा जिल्ह्यातील पिंपळगावपर्यंत ५८.४ किमी विस्तार• प्रकल्प कालावधी आधी पूर्ण होणारे समृद्धी महामार्गाचे पहिले पॅकेज• १५० किलोमीटर प्रतितास गती (डिझाईन स्पीड)• २०० पेक्षा जास्त बांधकामे• ५३ बॉक्स कल्व्हर्ट, २५ लहान पूल, १९ वाहनासाठी भुयारी मार्ग, १२ पादचारी भूमिगत मार्ग, ११ फ्लायओव्हर, पाच मोठे पूल, दोन रेल्वे ओव्हर ब्रिज, दोन वन्यजीव उन्नतमार्ग, दोन वन्यजीव भूमिगत मार्ग• समृद्धी महामार्गामधील सर्वात रुंद आणि देशातील पहिला वन्यजीव उन्नत मार्ग• १२ किमी ओपन हिल कटिंग• वर्धा नदीवरील ३१५ मीटर लांबीचा प्रमुख पूल १४ महिन्यांत पूर्ण• वर्धा नदीवर स्टीलचा वापर करून बो स्ट्रिंग ब्रीज बांधला