काम करा अन्यथा तुमची शाखाच बरखास्त करू : 'इंटक'च्या पदाधिकाऱ्यांना तंबी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 08:15 PM2021-01-09T20:15:58+5:302021-01-09T20:16:53+5:30
केंद्र सरकारने कामगार कायद्यात केलेल्या दुरूस्त्यांच्या विरोधात इंटकच्या वतीने जानेवारीत विधानसभेवर मोर्चा काढण्यात येणार आहे.
पुणे: काम करा अन्यथा तुमची शाखा बरखास्त करण्यात येईल, अशी तंबी इंटकचे राज्य अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी आपल्याच पदाधिकाऱ्यांना दिली आहे. इंटक ही काँग्रेस प्रणित देशातील एकेकाळची बलाढ्य कामगार संघटना आहे.
केंद्र सरकारने कामगार कायद्यात केलेल्या दुरूस्त्यांच्या विरोधात इंटकच्या वतीने जानेवारीत विधानसभेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याची तयारी करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर थेट अथ्यक्षांनीच पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्यास सुरूवात केली आहे. आपल्या अपेक्षा पूर्ण होत नसल्याची खंतच त्यांनी जिल्हा पदाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात ठळकपणे व्यक्त केली आहे.
छाजेड यांनी पत्रात म्हटले आहे की, जिल्हाध्यक्षांनी आपल्या जिल्ह्यातील इंटक संलग्न कामगार संघटनांचे एकत्रिकरण करणे, त्यांना शक्ती देणे, नव्याने कामगार संघटना रजिस्टर करणे अशा प्रकारची कामे करणे अपेक्षित आहे. दुर्दैवाने यातील कोणतीच अपेक्षा पुर्ण होत नाही असे दिसते. त्यामुळे इंटकची जिल्हास्तरावर पुनर्रचना करावी लागणार असे दिसते आहे.
जानेवारीत इंटकच्या वतीने मुंबईत राज्यस्तरीय मोर्चा काढण्यात येत आहे. त्यासाठी त्वरीत नियोजन सुरू करावे. जास्तीतजास्त कार्यकर्ते या मोर्चाला उपस्थित राहतील यादृष्टिने प्रयत्न करावेत, त्याची लेखी माहिती राज्यशाखेला त्वरीत पाठवावी, कसलीही अडचण असेल तर जिल्ह्यातील राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांना विचारावे अशी सुचनांची जंत्रीच छाजेड यांनी जिल्हा पदाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात दिली आहे. त्याचबरोबर याप्रमाणे काम झाले नाही तर जिल्हा शाखा बरखास्त करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.