राम शिनगारे / ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद, दि. १२ : मराठा समाजाने मुंबई काढलेल्या विशाल मोर्चानंतर मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात विविध मागण्यांच्या संदर्भात घोषणा केली. यात ‘बार्टी’च्या धर्तीवर ‘सारथी’ संस्थाचा उल्लेख झाला. या संस्थेच्या स्थापनेची घोषणा ९ डिसेंबर २०१६ रोजी केली होती. त्यानंतर सहा महिने यासंदर्भात कोणतीही कार्यवाही झाली नाही. मात्र ९ आॅगस्ट रोजी मुंबईत मोर्चा निघण्यापूर्वीच याविषयी जोरदार हालचाली करत संस्थेचे कामकाज व उद्दिष्ट निश्चितीसाठी नेमलेल्या समितीच्या कामाला वेग दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोपर्डी येथे घडलेल्या अमानवी घटनेनंतर मराठा समाजाने ९ आॅगस्ट २०१६ पासून मराठा क्रांती मुक मोर्चाचे राज्यभरात आयोजन केले. या मोर्चेक-यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मागील वर्षांपासून अनेकवेळा घोषणा केल्या. यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थाच्या (बार्टी) धर्तीवर मराठा समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्था स्थापन करण्याचा समावेश होता. याची घोषणा नागपूर येथील विधिमंडळाच्या अधिवेशनात ९ डिसेंबर २०१६ रोजी केली.
यानंतर राज्य सरकारने ३ जानेवारी रोजी संस्थेची रचना, कार्य, उद्देश ठरविण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक व अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. या समितीचे सदस्य म्हणून बार्टीचे माजी महासंचालक डी. आर. परिहार यांना नेमले. याविषयी काढलेल्या शासन निर्णयात स्पष्टता नव्हती. ही संस्था केवळ मराठाच नव्हे तर सर्वांसाठी असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट झाल्यामुळे मराठा समाजात नाराजीचा सुर उमटले होते.
याविषयी ‘लोकमत’ने १६ मे रोजीच्या अंकात प्रकाश टाकला होता. ३ जानेवारीपासून जुलैपर्यंत समितीच्या कामकाजासाठी कार्यालय सूध्दा मिळाले नव्हते. पुण्यातील ‘बार्टी’च्या कार्यालयात एक खोली देण्याचे प्रस्तावित होते. मात्र त्यास समितीने हरकत घेतली होती. त्यामुळे घोषणेनंतरच्या ७ महिन्यात ‘सारथी’ विषयी कोणतेच पाऊल उचलण्यात आले नाही. मात्र पुन्हा ९ आॅगस्ट रोजी मुंबई मराठा क्रांती मोर्चा काढण्याची घोषणा झाल्यानंतर सरकारी पातळीवर सूत्र वेगाने हालली.
५ जुलै रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने शासन निर्णय काढत आगोदरच्या चुका दुरुस्त करत मराठा, कुणबी व शेती व्यवसायातील बहुजन समाज यांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासावर प्रकर्षाने लक्ष देण्यासाठी, प्रश्न जाणून घेवून त्याचा सविस्तर अभ्यास,उपायोजनांसाठी ‘सारथी’ची स्थापना प्रस्तावित असल्याचे स्पष्ट केले. तसेच डॉ. मोरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीला संस्थेची रचना, प्रारूपासंदर्भात आवश्यक त्या सुविधा, कर्मचारी आणि कार्यालयाला जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश ‘बार्टी’ला दिले. यासह समितीचे अध्यक्ष, सदस्याचे मानधन, प्रवासभत्ते याविषयी सूध्दा स्पष्ट सूच ना देण्यात आल्या. यानंतर संस्थेच्या निर्मितीसंदर्भात कामकाजला वेगाने सुरूवात झाली आहे.
‘बार्टी’च्या बाहेर समितीचे कार्यालय‘सारथी’ संस्थेच्या स्थापनेसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीचे कार्यालय ‘बार्टी’ संस्थेमध्ये स्थापन करण्यात आलेले नसल्याचे डॉ. मोरे यांनी सांगितले. ‘बार्टी’ने केवळ सर्व गोष्टी जळवून दिल्या आहेत. या समितीचे स्वतंत्रपणे कामकाज करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
निर्धारित वेळेत काम संपविण्याचे प्रयत्न ‘सारथी’ संस्थेच्या निर्मितीसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीचे कामकाज दररोज करण्यात येत आहे. सरकारने दिलेल्या निर्धारित वेळेत हे काम संपविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कार्यालय मिळाले असून, कर्मचारी टप्प्याटप्याने उपलब्ध होतील. - डॉ. सदानंद मोरे, अध्यक्ष, सारथी संस्था निर्मिती समिती