मुंबई : शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आज सलग चौथ्या दिवशी विधान परिषदेत विरोधकांनी कामकाज रोखून धरल्याने जोरदार शाब्दिक चकमकी झडल्या. विरोधकांना चर्चाच होऊ द्यायची नाही, राजकीय हेतूने सभागृहाचा वेळ वाया घालविला जात असल्याची टीका सभागृह नेते व महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केली. गुरुवारी सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ होताच विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नियम २८९ अन्वये कर्जमाफीवर चर्चेची मागणी केली. शेतकऱ्यांनी पेरणी करून २५ दिवस उलटले तरी पावसाची चिन्हे नाहीत. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळायला हवी, अशी मागणी मुंडे यांनी केली. मुंडे यांच्या वक्तव्यानंतर विरोधी सदस्यांनी थेट वेलमध्ये धाव घेत घोषणाबाजी सुरू केली. तेवढ्यात खडसे बोलायला उभे राहताच विरोधकांनी पुन्हा गदारोळ सुरू केला. त्यामुळे चिडलेल्या खडसेंनी विरोधकांना धारेवर धरले. विरोधक राजकीय हेतूने गोंधळ घालत आहेत. या गदारोळामुळे साडेतीन दिवस सभागृहाचे कामकाज चालू शकले नाही. जनतेचा पैसा विनाकारण वाया जात आहे. चर्चेनंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग निघेल; मात्र विरोधकांना चर्चाच करायची नाही, अशी टीका खडसे यांनी केली. तरीही विरोधकांची घोषणाबाजी सुरू राहिल्याने अखेर सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी १ तासासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. त्यानंतरही परिस्थिती तीच राहिल्याने अनुक्रमे वीस मिनिटे आणि एक तासासाठी सभागृह तहकूब झाले. चौथ्यांदा सभागृहाचे कामकाज सुरू झाले तेंव्हा मंत्री प्रकाश मेहता यांनी विरोधकांना चर्चेचे आवाहन केले. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांच्यात चर्चा झाली. या वेळी विरोधकांचा गैरसमज झाला असून कर्जमाफी देणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले नव्हते. तर, कर्जमाफी हा एकमेव मार्ग नसल्याचे विधान केले होते. त्यामुळे विरोधकांनी चर्चेला सुरुवात करावी, असे आवाहन केले. प्रकाश मेहता यांच्या आवाहनानंतर सभागृहात नियम २६० अन्वये शेतकरी कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर चर्चेला सुरुवात झाली. (प्रतिनिधी)खडसेंची खदखद सभागृहाचे कामकाज सुरू होताच सभापतींनी विरोधी पक्षनेत्यांना बोलण्याची संधी द्यावी. नेत्यांच्या छोटेखानी भाषणानंतर लागलीच विरोधी सदस्यांनी गदारोळाला सुरुवात करावी, हा क्रम सलग चौथ्या दिवशी कायम राहिला.सभागृह नेते असणाऱ्या खडसेंना या काळात आपले बोलणेच पूर्ण करता आले नाही. त्यामुळे आज जेंव्हा खडसेंना बोलायची संधी मिळाली तेंव्हा, ‘सभागृह नेत्याला अधूनमधून का होईना बोलण्याची संधी दिलीत, त्याबद्दल आभारी आहे,’ असे म्हणत खडसेंनी आपली खदखद व्यक्त केली.
चौथ्या दिवशीही कामकाज रोखले
By admin | Published: July 17, 2015 12:23 AM