मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील कलंकित मंत्र्यांच्या चौकशीच्या मागणीवरून विरोधकांनी सलग तिस-या दिवशी विधान परिषदेचे कामकाज रोखून धरले. आरोप झालेल्या मंत्र्यांनी स्वत:हून केलेला खुलासा संयुक्तिक नसल्याने चौकशी आयोग नेमून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत कामकाज बंद पाडले.बुधवारी सभागृहाची नियमित बैठक सुरु होताच काँग्रेसचे नारायण राणे यांनी मंत्र्यांच्या चौकशीचा मुद्दा उपस्थित केला. विरोधकांनी सर्व पुरावे दिले असताना सरकार मंत्र्यांची चौकशी का करत नाही. भ्रष्टाचारमुक्त भारताच्या बाता मारण्याऐवजी अगोदर भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करा,अशी मागणी करत राणे यांनी चौकशीचा मुद्दा लावून धरला. त्याचवेळी विरोधी सदस्यांनी सभापतींसमोरील मोकळ्या जागेत जमा होत घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज सुरुवातीला १२.३० वाजेपर्यंत तर नंतर १ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर संसदीकय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी विरोधकांच्या गोंधळावर नाराजी व्यक्त केली. या विषयावर सभागृहात दोन-तीन दिवस चर्चा झाली. विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी तर इथे संबंधित मंत्र्यांनी उत्तरे दिली. तरीसुद्धा वारंवार गोंधळ करून सभागृहाचे कामकाज होऊ न देणे ही बाब याग्य नसल्याचे बापट म्हणाले. (प्रतिनिधी)तोपर्यंत कामकाज चालणार नाहीभ्रष्ट मंत्र्यांच्या यादीत बापटांचेही नाव आहे. जनतेच्या पैशातून भ्रष्टाचार झाला आहे. आपले सरकार पारदर्शक असल्याचा दावा करता तर मग चौकशीला का घाबरता, असा सवाल करत जोपर्यंत चौकशीची घोषणा होत नाही तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालणार नाही, असे राणे म्हणाले. यावर पुन्हा घोषणाबाजी आणि गदारोळास सुरुवात झाली. या गदारोळातच सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
तिसऱ्या दिवशीही कामकाज ठप्प !
By admin | Published: July 28, 2016 4:35 AM