महाराष्ट्र आणि देशात काँग्रेसची सत्ता पुन्हा आणण्यासाठी काम करा, काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 07:22 PM2024-01-11T19:22:15+5:302024-01-11T19:22:40+5:30
Congress News: भाजपाच्या दडपशाहीसोर काँग्रेस डगमगली नाही. महाराष्ट्र हे काँग्रेस विचाराचे राज्य आहे. एकजुटीने काम केले तर महाराष्ट्रात व देशात पुन्हा काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्वास प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या सरकारविरोधात देशभरात मोठा आक्रोश आहे. देशाची एकता व अखंडता मोडीत काढण्याचे काम भाजपा सरकारने मागील दहा वर्षात केले आहे. जातीय तणाव निर्माण करून भाजपा सामाजिक सौहार्द बिघडवत आहे. विरोधीपक्षांना घाबरवण्यासाठी ईडी, सीबीआयचा गैरवापर केला जात आहे पण भाजपाच्या या दडपशाहीसोर काँग्रेस डगमगली नाही. महाराष्ट्र हे काँग्रेस विचाराचे राज्य आहे. एकजुटीने काम केले तर महाराष्ट्रात व देशात पुन्हा काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्वास प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेस कार्यकारिणीच्या विस्तारित बैठकीत रमेश चेन्नीथल्ला यांनी मार्गदर्शन केले व त्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित केले. रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुका दोन महिन्यात होत आहेत, यासाठी काँग्रेस पक्ष सर्व ताकदीने मैदानात उतरत आहे. राज्यातील सहा विभागात आढावा बैठका घेतल्या जाणार आहेत, त्यानंतर जिल्हा स्तरावर, ब्लॉक स्तरावरही बैठका घेऊन पक्ष संघटनेच्या तयाराची आढावा घेतला जाणार आहे. देशपातळीवर भाजपाविरोधी पक्षांची इंडिया आघाडी काम करत असून सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे काम सुरु आहे, महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून जागा वाटपावरही चर्चा झाली असून ही चर्चा सकारात्मक झालेली आहे, लवकरच जागा वाटपाचा निर्णय होईल. २०१९ च्यानिवडणुकीत भाजपाला ३० टक्के मिळाली होती म्हणजे ७० टक्के मते विरोधात होती या सर्व पक्ष एकत्र आले तर भाजपाचा पराभव करणे शक्य आहे. भाजपा व आरएसएसच्या विचारधारेविरोधात ही लढाई असून भाजपा देशाचा इतिहास, परंपरा, लोकशाही, संविधान व सर्व व्यवस्था मोडीत काढत आहे. भाजपा सरकारला सत्तेतून खाली खेचने हेच काँग्रेसचे लक्ष्य आहे. महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार विजयी करण्यासाठी काम केले पाहिजे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या फोडा व राज्य करा नितीच्या विरोधात देशात संताप आहे. भाजपा सरकारने सर्व व्यवस्था मोडीत काढल्याने राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली होती त्या यात्रेला अभूतपूर्व यश आले तसेच यश आता भारत जोडो न्याय यात्रेलाही येईल. महाराष्ट्राने भारत जोडो यात्रा यशस्वी केली होती. जनतेने या यात्रेला मोठा प्रतिसाद दिला होता तसाच प्रतिसाद भारत जोडो न्याय यात्रेलाही मिळेल. महाराष्ट्रात ही यात्रा पाच दिवस सहा जिल्हे ४७९ किमी असून यात्रेचा शेवट मुंबईत होणार आहे. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. देशातील ७० कोटी जनतेचे उत्पन्न किमान वेतनापेक्षा कमी आहे. एवढी मोठ्या लोकसंख्येचे जीवनमान खालावले आहे. शेतकरी बेहाल आहे, बरोजगारी प्रचंड वाढली आहे, स्पर्धा परिक्षांचे पेपर फुटत आहेत, महागाई वाढली आहे आणि केवळ मुठभर मित्रांचा फायदा होत आहे. आर्थिक, सामाजिक, राजकीय न्याय देण्यासाठी भारत जोडो न्याय यात्रा मणिपूर पासून मुंबईपर्यंत ६९०० किमीचा प्रवास करणार आहे व मुंबईत महारॅली होणार आहे.
अशोक चव्हाण म्हणाले की, सध्या वन नेशन वन इलेक्शनची चर्चा जोरात सुरु असून भाजपा लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुकाही घेऊ शकते. निवडणुका केव्हाही होऊद्या पण आपण त्यासाठी तयार असेल पाहिजे. तेलंगणात निवडणुकीच्या चार महिने आधी काँग्रेस पक्ष चौथ्या क्रमांकावर असेल अशी चर्चा केली जात होती पण चित्र बदलले सर्वांनी झोकून देऊन काम केले व तेलंगणात काँग्रेसची सत्ता आली. कर्नाटकातही काँग्रेसने भाजपाचा पराभव करत मोठा विजय मिळवला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला आमदार अपात्रतेचा निकाल हा लोकशाहीला घातक आहे. अशा पद्धतीने देशातील सर्वच राज्यात राजकीय अस्थिरता माजेल, हा निर्णय राजकीय होता. या निर्णयाचा काँग्रेस पक्ष निषेध करत आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, २०२४ वर्षात आव्हाने आहेत, लोकसभा निवडणुका आहेत त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत. या दोन्ही निवडणुकीमध्ये चांगले यश मिळाले पाहिजे. भाजपा विरोधात एकजूट करून निवडणुका लढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत सर्वांनी एकत्र काम केले तर विजयाची पताका नक्की फडकेल. भारत जोडो यात्रेने एक चैतन्य निर्माण केले होते त्याप्रमाणेच भारत जोडो न्याय यात्राही यशस्वी करून दाखवू.
पत्रकार परिषदेत राम मंदिरासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रेमश चेन्नीथला म्हणाले की, मंदिराचे बांधकाम अर्धवट झाले आहे अशा अर्धवट बांधकामाच्या मंदिरात प्राण प्रतिष्ठा करणे चुकीचे आहे. हिंदू धर्माचे सर्वोच्च असलेल्या चारही शंकराचार्यांनी हेच म्हटले आहे, ते सुद्धा या कार्यक्रमाला जाणार नाहीत. काँग्रेसला निमंत्रण होते पण हा कार्यक्रम राजकीय फायद्यासाठी आहे व अर्धवट मंदिरात प्राणप्रतिष्ठा करणे अयोग्य आहे. असे उत्तर चेन्नीथला यांनी दिले.