Vidhan Sabha: मध्यरात्रीपर्यंत कामकाज चालले, सकाळी अनेक मंत्री गैरहजर राहिले, अजितदादा, कोळंबकर संतापले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 11:24 IST2023-03-15T11:23:17+5:302023-03-15T11:24:21+5:30
रात्री १ वाजेपर्यंत अधिवेशन चालले होते. यामुळे सर्वच पक्षाच्या आमदार, मंत्र्यांना जाण्यासाठी उशीर झाला.

Vidhan Sabha: मध्यरात्रीपर्यंत कामकाज चालले, सकाळी अनेक मंत्री गैरहजर राहिले, अजितदादा, कोळंबकर संतापले!
विधानसभेत आज मोठा गोंधळ उडाला आहे. लक्षवेधीला मंत्रीच आले नसल्याने ती उद्यावर ढकलण्यात आल्याने कालिदास कोळंबकर, विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले आहेत. मंत्र्यांच्या अनुपस्थितीवर तालिकाध्यक्ष संजय शिरसाट यांची तीव्र नाराजी. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
मंगळवारी रात्री १ वाजेपर्यंत अधिवेशन चालले होते. यामुळे सर्वच पक्षाच्या आमदार, मंत्र्यांना जाण्यासाठी उशीर झाला. लक्षवेधी सकाळी लवकर असल्याने विरोधी पक्षाचे तसेच सत्ताधारी पक्षाचे आमदार सभागृहात दाखल झाले होते. परंतू, शिंदे सरकारच्या मंत्र्यांनीच दांडी मारल्याने लक्षवेधी पुढे ढकलण्याची वेळ सरकारवर आली.
यामुळे मंत्र्यांवर सत्ताधारी तसेच विरोधकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. मंत्र्यांच्या अनुपस्थितीवर तालिकाध्यक्ष संजय शिरसाट यांची तीव्र नाराजी व्यक्त केली.
मंत्रीपदासाठी पुढे-पुढे, मग कामात मागे का? अशी टीका कालिदास कोळंबकर यांनी केली. मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून अजित पवारही संतापले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नाराजी व्यक्त करत आम्ही मंत्र्यांना समज देऊ असे सांगितले आहे.
आम्ही काल रात्री १ वाजेपर्यंत अधिवेशनात थांबलो. लक्षवेधी आज लवकर असल्याने आम्ही लवकर अधिवेशनात आलो. मात्र उत्तर देणारे मंत्री महोदय अधिवेशनात आलेले नाहीत. मग हे मंत्री अधिवेशनाला गांभीर्याने घेत नाही. नेमके हे मंत्री कशासाठी झालेत हा प्रश्न उपस्थित होतोय, आमच्या सर्व लक्षवेधी या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याचा आम्ही नवीन आमदार निषेध करतो, असे रोहित पवार म्हणाले.