मुंबई : सामाजिक न्याय विभागामध्ये आघाडी सरकारच्या काळात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातील दोषींविरुद्ध तत्काळ गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी लाल सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज मंत्रालयात सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या कार्यालयात धडक दिली. या वेळी कार्यकर्ते आणि बडोले यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. ‘कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही, एक महिन्याच्या आत कारवाई केली जाईल,’ असे आश्वासन बडोले यांनी कार्यकर्त्यांना दिले. या घोटाळेबाजांविरुद्ध तत्काळ गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी लाल सेनेचे मराठवाडा, मुंबई व परिसरातील कार्यकर्ते आज आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसणार होते. ते या मैदानावर जमलेले असताना पोलीस त्या ठिकाणी आले आणि त्यांनी लाल सेनेच्या शिष्टमंडळाला बडोले यांच्या भेटीसाठी मंत्रालयात नेले. ‘लोकमत’मध्ये गेले काही दिवस या घोटाळ्यांच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्यावर आपण कोणती कारवाई केली, असा सवाल शिष्टमंडळाने बडोले यांना केला. कारवाई झाली नाही, तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आणि सात मागण्यांचे निवेदन दिले. सरकार दोषींवर पांघरूण घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. या वेळी महिनाभराच्या आत कडक कारवाई झालेली तुम्हाला दिसेल, असे बडोले यांनी शिष्टमंडळाला सांगितले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. (विशेष प्रतिनिधी) मी तुमच्यातलाच एक आहे‘मी तुमच्यातलाच एक आहे. दलितांच्या हक्काच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, याची खात्री बाळगा, महिनाभराच्या आत कडक कारवाई झालेली तुम्हाला दिसेल, असे बडोले यांनी शिष्टमंडळाला सांगितले. मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. शिष्टमंडळाचे नेतृत्व गणपत भिसे, अशोक उफाडे, दत्ता तांबे, अशोक उबाळे, प्रकाश बनपट्टे, समाधान घोडेस्वार, निर्मलाबाई झुबरे, बाळासाहेब साबळे, बालाजी आंदे, शंकर मदने, बळीराम झुबरे यांनी केले.
कार्यकर्ते अन् मंत्र्यांमध्ये खडाजंगी
By admin | Published: May 03, 2017 4:23 AM