काँग्रेसभवनाच्या तोडफोडीवर बाळासाहेब थोरात म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 02:46 PM2020-01-01T14:46:31+5:302020-01-01T14:49:36+5:30
शिवाजीनगर येथील काँग्रेसभवनाची तोडफोड केली होती.
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आमदार संग्राम थोपटेंना काँग्रेसचे सरकार आले तर मंत्रिपद देण्याचा शब्द दिला होता. मात्र, महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमध्ये संग्राम थोपटे यांना मंत्रिपद न दिल्यामुळे थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेसभवनात तोडफोड केली होती. या सर्व प्रकरणावर तीन पक्षांचे सरकार असल्याने मंत्रिपद कमी वाट्याला आल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, संग्राम थोपटे यांच्याशी माझं बोलणं झालं असून त्यांचा योग्यवेळी सन्मान केला जाईल. काँग्रेस पक्ष कुटुंबासारखे असून संग्राम थोपटे यांचा योग्यवेळी नक्की विचार करण्यात येईल असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
एकच दादा संग्रामदादा अशी घोषणाबाजी करत थोपटे समर्थकांनी मंगळवारी संध्याकाळी पुण्यातील शिवाजीनगर येथील काँग्रेसभवनाची तोडफोड केली होती. भोरचे आमदार संग्राम थोपटे यांना महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमध्ये मंत्रिपद डावलल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले होते.
काँग्रेसभवनाची कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्यानंतर संग्राम थोपटे यांनी घडलेला प्रकार निंदनीय आणि चुकीचा असल्याचे म्हटले होते. तसेच मी मंगळवारी मुंबईला मुक्कामी होतो. या संबंधित प्रकाराची मलाही माहिती नव्हती. तोडफोड करणारे कार्यकर्ते कोण आहेत याची माहिती मी घेत असल्याचे संग्राम थोपटे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शहर की ग्रामीण भागातील कार्यकर्ते आहेत की इतर पक्षातील कोणी विनाकारण गालबोट लावत आहेत, याचीही शहानिशा सुरू आहे. मला स्वतःला पक्षश्रेष्ठींनी दिलेला निर्णय मान्यच आहे आणि कायम राहील असं म्हणत कार्यकर्त्यांना शांततेत राहण्याचे आवाहन देखील संग्राम थोपटे यांनी केले आहे.