- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वीज मंडळाच्या कंत्राटी कामगारांनी सोमवारी, २२ मेपासून राज्यव्यापी काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत कंत्राटी आऊट सोर्सिंग कामगार संयुक्त कृती समितीने हा इशारा दिला. कामगारांच्या आंदोलनामुळे वीज मंडळाच्या वीज वितरण, निर्मिती आणि पारेषण यांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यताही समितीने व्यक्त केली आहे.वीज मंडळातील महावितरण, महानिर्मिती व महापारेषणमधील ३२ हजार कंत्राटी कामगारांना रानडे समितीच्या अहवालानुसार कायम करावे, अशी प्रमुख मागणी समितीने केली आहे. सर्व कंत्राटी कामगारांना रोजंदार कामगार पद्धतीनुसार कामावर घेऊन रोजगाराची हमी द्यावी, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार कामगारांना समान कामास समान वेतन द्यावे, त्यांची ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करून कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, अशा विविध मागण्या समितीने केल्या आहेत.दरम्यान, जे अधिकारी व कंत्राटदार काम करत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करून कंत्राटी कामगारांना न्याय द्यावा, असे आवाहन समितीने केले आहे. काम बंद आंदोलनाचा इशारा म्हणून शासनाला नोटीस दिल्याचे समितीने स्पष्ट केले. शिवाय शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ८ मे रोजी सर्व महानिर्मिती केंद्र येथे कामगारांनी निदर्शने केली होती.