औरंगाबाद : महाराष्ट्रात १९७२ पासून सुरू असलेल्या रोजगार हमी योजना केंद्र सरकारने देशात राबवायला सुरवात केली त्याचा दशकपूर्ती समारंभ साजरा करीत असताना ही योजना बंद करण्याच्या नजरेने केंद्र व राज्य सरकार वागत आहे. सरकारच्या व सरकारी यंत्रणेच्या या भूमिकेमुळे ग्रामीण जनता भरडली जात आहे. अशावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकारला जाग आणण्यासाठी सज्ज झाले पाहिजे, असे आवाहन मंगळवारी येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले. जगद्गुरू तुकाराम महाराज नाट्यगृहात प्रदेश काँग्रेसने मनरेगावरील राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेचा अध्यक्षीय समारोप करताना चव्हाण बोलत होते. रोहयोचे जनक वि.स. पागे व महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे, कुदळ फावड्याचे पूजन करून व दीप प्रज्वलित करून या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी, अभिजित देशमुख यांनी तयार केलेली १५ मिनिटांचा माहितीपट दाखविण्यात आला.चव्हाण यांनी सांगितले की, मूळ राज्याची ही योजना केंद्रीय स्तरावर स्वीकारून देशातील गरिबांना विश्वास देण्याचा व मागेल त्याला काम उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. दुष्काळ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यासाठी प्रसंगी नियमांमध्ये शिथिलताही आणली; पण सध्याचे सरकार मनरेगासह अनेक लोकोपयोगी योजना बंद करण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्रात तर मनरेगावरचा खर्च सध्याच्या सरकारने २०० कोटींपर्यंत खाली आणला आहे. दुष्काळाच्या प्रश्नावर राजकारण करायचे नाही, हीच काँग्रेसचीही भूमिका आहे. काँग्रेसने आपल्या परीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुुटंबियांना आर्थिक मदतही केली. विधानसभेवर प्रचंड मोठा मोर्चाही काढला. सध्याचे सरकार कर्जमाफीच्या मागणीकडे दुर्लक्ष तर करीतच आहे; पण दुष्काळावरच्या अन्य उपाययोजनांच्या बाबतीत एकदम उदासीन दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
सरकारला जाग आणण्यासाठी कार्यकर्त्यांनो सज्ज व्हा!
By admin | Published: February 03, 2016 3:40 AM