मनोज जरांगे यांनी जो काही निर्णय घेतला आहे (निवडणूक न लढवण्याचा) त्याला फार उशिरा केला. एक तर कार्यकर्त्यांना अर्ज भरायला लावणे, ४ तारखेला आम्ही लिस्ट जाहीर करतो, असे सांगणे, नंतर पुन्हा दुसरी तारीख देणे, यामुळे कार्यकर्त्यांचे आर्थिक नुकसान झाले. हे कार्यकर्त्यांनीही बोलवून दाखवले आहे. असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. याशिवाय, निवडणुकीनंतर, सर्वांमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच होईल आणि अशा परिस्थितीत आम्ही व्यवस्थित डाव मारू," असा विशअवासही बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. ते अमरावतीत माध्यमांसोबत बोलत होते. जरांगे यांच्या निवडणूक न लढवण्याच्या घोषणेसंदर्भात बोलताना बच्चू कडू म्हणाले, "खरे तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण जो काही निर्णय घेतला, त्याला फार उशिरा केला. एक तर कार्यकर्त्यांना अर्ज भरायला लावणे. ४ तारखेला आम्ही लिस्ट जाहीर करतो, नंतर पुन्हा दुसरी तारीख देणे, यामुळे कार्यकर्त्यांचे आर्थिक नुकसान झाले. हे कार्यकर्त्यांनी बोलवूनही दाखवले. एक तर आपण सांगायला हवे होते की, निवडणूक लढणार नाही. आता तुम्ही निवडणुकीचे २५ टक्के, ५० टक्के पार्ट झाल्यानंतर सांगत आहात की आता नाही लढत. यात ज्या कार्यकर्त्यांनी इकडून तिकडून पैसे आणून खर्च केला होता, त्याला आर्थिक झळ बसली आहे.
कडू म्हणाले, "त्यांची (जरांगे) एक गोष्ट मान्य आहे की, एका जातीवर निवडणूक होत नाही आणि एका जातीवर निवडणूक करण्याचा कुणी प्रयत्नही करू नये. कारण देशात जात आणि धर्म आणि पैसा या सगळ्या गोष्टींना दूर ठेवून राजकीय पक्षांना राजकारण करता येत नाही. ही सर्वात मोठी कमजोरी आहे. मात्र सगळे पक्ष धर्म, जात आणि पैसा सोडून जर उतरण्याची तयारी नसल्याने, संपूर्ण देशावर त्याचा मोठा परिणाम होत आहे."
"लोक मूळ मुद्द्यांऐवजी नको ते मुद्दे बाहेर आणल्याने, आज अतिशय वाईट स्थिती देशात आहे. तुम्ही जर पाहिले, तर रुग्णालयांचे काय हाल आहेत, शाळांचे काय हाल आहेत, शेतीमालाला भाव नाही. या अनेक गोष्टी आपण पाहिल्या, तर याचा प्रचंड रोष लोकांमध्ये आहे. परंतु आम्ही राजकीय लोकांनी जाती-धर्माच्या मुद्द्यावर यश मिळवले आहे. यामुळे मूळ मुद्द्यांपासून दूर जात आहोत," असेही कडू यांनी म्हटले आहे.
किती जागा लढवणार आणि भविष्यात महायुती अथवा महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याची वेळ आली तर आपले पर्याय खुले आहेत का? असे विचारले असता, कडू म्हणाले, "आम्ही ४० जागा आता महाशक्तीमध्ये लढणार आहोत. संपूर्ण महाशक्ती १२१ जागा लढते आहे आणि यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काही जागेवर आम्ही विजय मिळवणार आहोत. आता राहिला प्रश्न पुढे काय करणार आहोत? तर मला वाटते आमचे सरकार बनेल. सगळ्यांची सांगड तुटेल. सगळ्यांमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच होईल आणि अशा परिस्थितीत आम्ही व्यवस्थित डाव मारू," असा विश्वासही बच्चू कडू यांनी यावेळी व्यक्त केला.