मुंबई : भायखळ्यातील राणीबाग येथून आझाद मैदानापर्यंत काढण्यात येणारा गिरणी कामगारांचा मोर्चा, मंगळवारी भायखळा पोलिसांनी राणीबाग येथेच रोखला. उच्च न्यायालयाचे आदेश असल्याने मोर्चा काढता येणार नाही, असे खोटे कारण पोलिसांनी दिल्याचा आरोप संतप्त झालेले शिवसंग्रामचे नेते उदय आंबोणकर यांनी केला आहे.आंबोणकर म्हणाले की,‘लवकरात लवकर घरे मिळावी, म्हणून कामगार आणि वारसांनी राणीबाग येथून धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता, त्यासाठी आवश्यक परवानगीही घेतली होती. मात्र, मोर्चा काढण्यासाठी राणीबाग येथे जमलेल्या कामगार आणि वारसांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मोर्चा काढता येणार नाही, असे कारण सांगत वृद्ध कामगारांना पोलिसांनी गाडीत बसवले. शेकडो वारस आणि कामगारांना ताब्यात घेऊन पोलिसांनी थेट आझाद मैदानात सोडले. (प्रतिनिधी)गिरणी कामगारांच्या आंदोलनाची दखल घेत, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार विनायक मेटे यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यात संघटनेने सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची तपासणी करून, विधानसभा सत्र संपल्यानंतर वस्त्रोद्योगमंत्री, महसूलमंत्री आणि गृहनिर्माणमंत्री यांच्यासोबत संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे उदय आंबोणकर यांनी सांगतिले. ते म्हणाले की, ‘या बैठकीनंतरच्या आठ दिवसांत संघटनेच्या शिष्टमंडळालाही चर्चेसाठी बोलावू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले; शिवाय सर्व गिरणी कामगारांना घरे देण्याची सरकारची भूमिका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.’मुंबईबाहेर घरे न देता, सरकारने सर्व गिरणी कामगारांना मुंबईतच घरे देण्याची मागणी संघटनेने केली आहे. घरे उभारण्यासाठी आवश्यक जागांचा तपशील सरकारला निवेदनाद्वारे पाठवल्याचे संघटनेने स्पष्ट केले. तरी गिरणी कामगारांसोबत त्यांच्या वारसांचा अंत न पाहता, तत्काळ घरे देण्यासाठी नव्याने धोरण आखण्याची मागणी संघटनेने केली.
गिरणी कामगारांचा मोर्चा रोखला
By admin | Published: July 27, 2016 2:38 AM