मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या विरोधकांमुळे विधान परिषदेचे कामकाज आज सलग तिसऱ्या दिवशी ठप्प झाले. बुधवारी दुपारी नियमित कामकाजाला सुरुवात होताच विरोधी बाकावरील सदस्यांनी कर्जमाफीचा मुद्दा रेटला. सभागृहाचे सर्व कामकाज बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करावी यासाठी नियम २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडला. या वेळी बोलताना राष्ट्रवादीचे गटनेते सुनील तटकरे म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकार अजिबात गंभीर नाही. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी विदर्भातील एका गावात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि मदतीचे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही त्या गावातील आत्महत्या थांबल्या नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची विश्वासार्हता पणाला लागल्याचे तटकरे म्हणाले.काँग्रेसचे शरद रणपिसे म्हणाले की, सरकार कोणत्याच प्रश्नावर गंभीर नाही. शेतकऱ्यांचा प्रश्न असो अथवा गिरणी कामगारांच्या घरांचा, सरकार मोघम उत्तरे देत आहे. जोपर्यंत कर्जमाफी असो अथवा गिरणी कामगारांची घरे; स्पष्ट आणि ठोस निर्णयाशिवाय कामकाज चालू देणार नसल्याचे रणपिसे म्हणाले. यावर महसूल मंत्री एकनाथ खडसे म्हणाले, विरोधकांना चर्चा करायची नाही. गोंधळ घालायचे ठरवूनच ते सभागृहात आले असल्याचा आरोपही त्यांनी केला. सभागृहातील गोंधळ पाहून सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. (प्रतिनिधी)
तिसऱ्या दिवशीही कामकाज ठप्प
By admin | Published: July 16, 2015 2:15 AM