ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 03 - अगोदरच्या वेळी पहाटे पाचपर्यंत कामकाज चालत असे, पण आता सभागृहांचे कामकाजाचे दिवस आणि वेळ कमी कमी होऊ लागले आहेत अशी खंत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी व्यक्त केली आहे. लोकमत विधीमंडळ पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने शिवराज पाटील यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. लोकमतचे पॉलिटिकल एडिटर सुरेश भटेवरा यांनी शिवराज पाटील यांची मुलाखत घेतली.
आम्ही जेव्हा विधान परिषद, विधानसभा सुरु झाली तेव्हा 90- 100 दिवस काम करायचो. पंडितजींच्या काळात कमीत कमी 150 दिवस काम चालायचे. सध्या 70 दिवस , महाराष्ट्रात 45 ते 50 दिवस , आणि काही राज्यात 9 दिवस काम सुरु असते. लोकसभेचं कामकाज जेव्हा टीव्हीवर दाखवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांना गोंधळ जास्त दाखवला, लोकसभा सभापतीच्या परवानगीने कोणी बोलत नसेल, तेव्हा कॅमेरा फिरवून इतर दाखवा तर गोंधळ कमी होईल असं मत शिवराज पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
पुरस्कार सोहळा आयोजन करण्यामागचं प्रयोजन
संसदीय कार्याच्या माध्यमातून देशाचे, समाजाचे कल्याण आणि जनतेच्या आशा-आकांक्षांना वास्तवात आणण्याचे काम होते. संसद आणि विधिमंडळाने लोककल्याणाचे मार्ग प्रशस्त करण्यासाठी अनेक महत्त्वाचे कायदे करण्याचे काम केले आहे, परंतु अलीकडच्या काळात संसद असो की, देशभरातील विधिमंडळे, यात विविध अंगाने चर्चा, सकस वादविवाद न होता सभागृह बंद पाडणे, चर्चा न होणे व गोंधळात विधेयके मंजूर करून घेणे, असे प्रकार सातत्याने घडताना दिसतात. समाजधुरिणांना, विचारवंतांना जशी याविषयी काळजी आहे तसेच कोट्यवधी जनतेला अपेक्षाभंगाचे दु:ख आहे. कारण सुसह्य जीवन जगण्यासाठी, अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी जनतेला याच सभागृहांकडून अपेक्षा आहेत. बेचैन असलेल्या तरुण पिढीचा सभागृहांविषयीचा आदर कमी होऊ नये या प्रामाणिक हेतूने या पुरस्कारांचे आयोजन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले आहे.