मुंबई : पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे महापालिकेपुढे आव्हान आहे. मात्र या कामासाठी लागणाऱ्या खडीचा पुरवठा बंद झाल्यामुळे महापालिका प्रशासन अडचणीत आले आहे. त्यामुळे किमान खोदलेले रस्ते तरी पूर्ववत करण्याची संधी मिळावी यासाठी ही सामग्री मिळवण्याचे महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला यश मिळाले असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यातील काही खडी प्राधान्याने मुंबईला मिळणार असल्याचे समजते.दगडांचे उत्खनन करून खडी तयार करण्यात येते. या खडीचा वापर रस्त्यांच्या कामांमध्ये होतो. मात्र ठाण्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी काही दिवसांपूर्वी या उत्खाननावर बंदी आणली. याचा फटका महापालिकेच्या रस्ते कामांना बसला आहे. मुंबईत सुरूअसलेली रस्त्यांची कामे ठप्प झाली आहेत. ठेकेदारांना माल मिळत नसल्याने रस्ते तयार करायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात रस्त्यांच्या कामाचा बोजवारा उडण्याचे चित्र आहे. नागरिकांची गैरसोय होणार असल्याने महापालिकेने आता खोदलेले रस्ते प्राधान्याने भरण्यास सुरुवात केली आहे.यासाठी महापालिकेच्या रस्ते विभागाने ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून मुंबईच्या ठेकेदारांना नवी मुंबईतून येणाऱ्या खडीचा साठा मिळण्याची मागणी केली आहे. मे अखेरपर्यंत या पुरवठादारांना महापालिकेला खडी पुरवावी जेणेकरून पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ववत करून खड्डे पडण्याचा धोका टळेल, अशी विनंती महापालिकेने केली आहे. त्यानुसार एमआयडीसीच्या अखत्यारीतील तीन पुरवठादारांकडून महापालिकेला खडीचा पुरवठा होणार आहे. (प्रतिनिधी)बजेट वाढण्याची भीती- रस्त्यांच्या पावसाळ्यापूर्व कामांसाठी महापालिकेला ५० हजार क्युबिक मीटर खडीची गरज आहे. मात्र, नवी मुंबईतील उत्खननावर बंदी आल्याने ठेकेदारांना आता मुंबईबाहेरील खदानींमधून खडी घ्यावी लागणार आहे.- मुंबईबाहेरील खडी मिळवण्यासाठी ठेकेदारांना वाहतूक खर्च उचलावा लागणार आहे. त्यामुळे याचा खर्च ते महापालिकेकडून नंतर वसूल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्ते कामाचे बजेट वाढण्याची भीती आहे. खडी मिळत नसल्याने पाच ते सहा ठेकेदारांचे काम रखडले असून मे अखेरपर्यंत काम पूर्ण होणे शक्य होणार नाही. अशांवर महापालिका कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहेत.नाशिक, पुण्यातून मालाची खरेदीमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे नियम पाळत नसलेल्या ७० खदानींवर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ मार्चपासून बंदी आणली आहे. गेल्या वर्षी मुंबई ऐन पावसाळ्यात खड्ड्यात गेली. यामुळे नागरिकांची गैरसोय व काही ठिकाणी अपघातही झाले. याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले. परिणामी पालिका प्रशासनाला टीकेचे धनी व्हावे लागले होते. त्यामुळे पालिका प्रशासनाने या वेळी सर्व खबरदारी घेतली. मात्र खडीच्या रूपाने नवे संकट आले. यातून मार्ग काढण्यासाठी पालिका आयुक्तांचे प्रयत्न सुरू असून तोपर्यंत खोदलेले रस्ते बुजविण्याचे आदेश ठेकेदारांना देण्यात आले. तसेच नाशिक व पुण्यावरून रस्ते तयार करण्यासाठीचा माल घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
खोदलेल्या रस्त्यांचे काम मार्गी लागणार
By admin | Published: April 30, 2017 3:11 AM