युगंधर ताजणे
पुणे :
ओळखलतं का मला रस्त्यावर भेटला कुणी, दाढी होती त्याने वाढवलेली, केस होते पिंजारलेले ... एखाद्या दशकापूर्वी कॉलेजच्या आवारात, कँटींनमध्ये, विविध उद्यानांमध्ये भरगच्च दाढीवाले युवक सहजासहजी दिसायचे. त्यावेळी त्यांना ‘‘देवदास’’ ‘‘आवारा’’ या नावाची ओळख ठरलेली. काळाचा महिमा मोठा अगाध. बदलत्या जमान्यानुसार दाढीला देखील साजुक, नाजुक, सोज्वळतेचे रुप आले. पूर्वी प्रेमभंग झालेला किंवा परीक्षेत नापास झालेला हेच दाढी ठेवायचे. ज्येष्ठांकडून त्यांच्या दिवसाच्या आठवणींचा पट अजुनही उलगला जातो. आता मात्र काहीही झालं तरी ‘‘क्लीन शेव्ह’’ नकोच. असा ट्रेंड वाढीस लागला आहे.
बॉलीवुडच्या एकापेक्षा एक चित्रपटांची क्रेझ युवकांच्या मनावर असल्याने त्यात दाढीचा नव्याने समावेश झाला आहे. शहरातील हेयर पार्लरमध्ये तर दाढींना वेगवेगळ्या आकारात कोरण्यासाठी गर्दी पाहवयास मिळत आहे. कुणाला बॉक्स टाईपची, तर कुणाला व्ही शेपची, कुणाला रेन्सो लुक यापेक्षा वेगळं म्हणजे ट्रंन्गल शेपमधील दाढ्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. याविषयी गेली आठ ते दहा वर्षापासून हेयर स्टायलीश म्हणून काम करणा-या शुभम शिंदे याला विचारले असता तो सांगतो, तरुणांमध्ये विराट कोहली आणि बॉडी बिल्डर रोमन हेन्स यांच्या दाढीची प्रचंड क्रेझ आहे. आपल्याकडे नवीन एखादा चित्रपट आला त्यातील कलाकाराने नवीन लुक केला असल्यास युवकांची आमच्याकडे गर्दी वाढते. आता तर सरासरी 80 टक्क्यांपेक्षा जास्त युवक क्लीन शेव्ह पेक्षा ती ट्रीम करण्यास प्राधान्य देतात. बहुतांशी जण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखी दाढी ठेवतात. मात्र त्या प्रकारच्या दाढीसाठी वेळ द्यावा लागतो. या दाढीची सातत्याने काळजी घ्यावी लागते. ज्याप्रमाणे केसांना वेगवेगळ्या प्रकारच्या केशकलपाने ती रंगवली जातात त्याचरीतीने हल्ली दाढीला देखील ‘‘ब्ल्यु, ग्रीन,’’ रंगाच्या शेडमध्ये रंगवले जाते. परंतु हा ट्रेंड परदेशात मोठ्या प्रमाणात आहे.
पूर्वी दाढी राखणे म्हणजे संबधित व्यक्तीचे मानसिक आरोग्य स्थिर नाही. असा सरसकट अर्थ लावला जाई. आता दाढी करुन गुळगुळीत झालेला चेहरा पाहवयास मिळणे दुर्मिळ झाले आहे. इतकेच नव्हे तर रंग देवून ती सजविण्याचा अनोखे प्रकार पाहवयास मिळत आहे. कार्यालयात औपचारिक पेहरावात येणे बंधनकारक आहे. हे सर्वश्रृत आहे. मात्र याप्रकारातून दाढी सोयीस्करपणे बाजुला पडली आहे. कारण आता दाढी वाढ्वून किंवा ती कमी करुन देखील कार्यालयात जाणे स्वीकारले गेले आहे. खासकरुन आयटी जॉब, मार्केटींग फिल्ड, फिल्ममेकर्स, आर्टीस्ट, आदी प्रकारच्या व्यवसायांमध्ये दाढी हा सिम्बॉल बनला आहे.
विराटची दाढी ... सॉलिड भारी
आपल्या दाढीचा विमा उतरविल्याच्या बातमीमुळे विराट कोहली चर्चेत होता. मात्र यामुळे यंग क्राऊडमध्ये दाढी क्रे झ भयंकर वाढली. आताही बॉलीवूडमधील अनेक मातब्बर कलाकारांपेक्षा विराटच्या दाढीची लोकप्रियता सर्वाधिक आहे. महाविद्यालयातील तरुणच नव्हे तर जॉबधारकांना देखील त्याच्याप्रमाणे दाढी ठेवण्याचा मोह काही केल्या आवरत नाही.
चॉकलेट नव्हे दाढीवाला हिरो....
गेल्या काही वर्षांपासून प्रदर्शित झालेल्या मराठी, हिंदी चित्रपटातील कलाकारांनी दाढी ठेवलेली दिसते. यावरुन सध्या चॉकलेट नव्हे तर दाढीवाल्या हिरोंची चलती अधिक आहे. केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातील तरुणांमध्ये दाढीची प्रचंड क्रेझ आहे. आपल्या चेह-याला शोभेल अशा प्रकारची दाढी ठेवण्याकडे तरुणाईचा कल आहे. जास्त मोठी नव्हे तर विरळ स्वरुपाची दाढी ठेवून तिला वेगळ्या आकारात बसविण्याला त्यांची पसंती असते. पारंपारिक पध्दतीने संपूर्ण चेहराभर दाढी ठेवण्यापेक्षा चेह-याचा आकार, बघुन त्यानुसार तिचे स्वरुप बदलले जात आहे माहिती स्टायलिश विकास चव्हाण यांनी दिली.