मी काय वाचतो? असा विचार जेव्हा मी करायला घेतो तेव्हा मला माझी वाचक म्हणून आणि माणूस म्हणून झालेली घडण आठवते. ही घडण साधारणपणे समांतरच असते. अगदी सुरुवातील लहानपणी मी हातात येईल ते वाचायचो. मग ते शांपूच्या पाकिटापासून कॉमिक्सपर्यंत सगळं. आताही थोडंफार तसंच आहे. पण तो काळ भाषेची समज वाढवणारा असतो, तिच्या प्रेमात पडण्याचा असतो. हे भाषेच्या प्रेमात पडणं तुम्हाला पुस्तकांच्या वेगळ्या जगात घेऊन जातं. लिटल वूमनचं शांता शेळकेंनी अनुवादित केलेलं पुस्तक चौघीजणी हातात आलं मी सुद्धा त्या वेगळ्या जगात गेलो. आजही त्या पुस्तकाच्या प्रेमात आहे. त्यावर युटोपियाचा आरोप होत असला तरीही ते कायम आहे. त्यानंतर काळाच्या ओघात एकेक चांगली पुस्तकं माझ्या समोर येत गेली. आधी मराठीत आणि नंतर इंग्रजीत. इंग्रजीत शेक्सपिअर अभ्यासाला होताच त्यानंतर त्याची नाटकं शिकवलीही त्यामुळे तो जरा जास्त समजून घेता आला. शेक्सपिअर आणि संत ज्ञानेश्वर ही सर्वार्थानं दोन वेगळ्या लांब टोकांवरची माणसं मला एकाच वेळी आवडतात. शेक्सपिअरचं आॅथेल्लो माझ्यावर चांगलंच परिणाम करुन गेलं, तर ज्ञानेश्वर जीवनाचं सार सांगत प्रेरणा देत राहिले.माझ्या मते काही पुस्तकं फक्त माहिती देतात, काही फक्त अनुभव मांडतात, काही ज्ञान देतात तर काही शहाणपण देतात. हे सगळं वाचक म्हणून एक माणूस म्हणून आपल्यासाठी आवश्यक वाटतं. सर्वच महत्त्वाचं वाटतं. निखळ विनोद, कॉमिक्स वाचायला माझा आजही आजिबात नकार नसतो. विनोदी साहित्य हे काहीतरी साधं आणि अमूक प्रकारची पुस्तकं म्हणजे चांगली असं मी मानत नाही. चांगला विनोद निर्माण करणं हे अत्यंत अवघड काम आहे आणि विनोदाचे बारकावे समजून ते वाचता येणं वाचक म्हणून तितकंच अवघड आहे. त्यामुळे श्रेष्ठ-कनिष्ठ असं त्यात मानू नये. मला वाटतं पुस्तकांनं माणसं घडतात तशी अगदीच कधीतरी बिघडतातही. जेव्हा आपण नवे वाचक असतो तेव्हा लेखकामुळे, भाषेमुळे, विचारांमुळे प्रभावित होतो. कालांतराने त्याच्या वाचनाची, विचारांची व्याप्ती वाढली की तो तुलना करायला लागतो. वास्तवदर्शी पुस्तकं, कादंबरी यातील त्याला हवं ते निवडू लागतो. पुस्तक वाचताना आपण त्यातील पात्रांपेक्षा वेगळे आहोत, आपलं जगणं वेगळं आहे हे त्याच्या लक्षात येतं. कधी तो त्यातील संवेदना स्वत:च्या व्यक्तीमत्त्वात रुजवतो किंवा कधी ती निर्धाराने बाजूलाही ठेवतो. माझी एक मैत्रिण सांगते की ती पुस्तक वाचताना काही दिवस त्यातलीच एक होऊन जाते, ही सुरुवातीची अवस्था काहीकाळानंतर दूर होते. किंवा वाचन आणि पुस्तकंच आपल्या स्वतंत्र व्यक्तीमत्वाची जाणीव करुन देतात. त्यामुळे मला वाचनामुळं घडणं एक सुंदर आनंददायी प्रवास वाटतो.
(डॉ. आशुतोष जावडेकर यांची मुळारंभ, लयपश्चिमा, नवे सूर अन् नवे तराणे ही पुस्तक प्रसिद्ध आहेत).