मुंबई : जागतिक वारसा लाभलेल्या औरंगाबाद जिल्ह्णातील अजिंठा-वेरुळ लेणी येथे जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे यांनी दिले.औरंगाबाद जिल्ह्णातील पर्यटन स्थळांच्या विकास करण्यासंदर्भात मंत्रालयात बैठक घेण्यात आली. बैठकीस आमदार प्रशांत बंब, पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन-नानौटिया, औरंगाबादचे विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, औरंगाबादचे जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह, महाव्यवस्थापक (अतिरिक्त) पर्यटन विकास महामंडळ, मुंबईचे चंद्रशेखर जयस्वाल आदी उपस्थित होते.पावसाळ्यात अजिंठा लेणी परिसरात दरडी कोसळतात. त्यावर तातडीने उपाय करावेत. तसेच एमटीडीसीच्या माध्यमातून जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. पर्यटकांनी राहण्यासाठी त्यांना सुरक्षा आणि करमणूक साधने उपलब्ध करुन देण्यात याव्यात. सुरक्षेच्या दृष्टीने येथे आणखी एक पोलीस ठाणे ही मंजूर केलेले आहे. संरक्षक भिंती बांधणे, पर्यटकांच्या वाहनांसाठी वाहनतळ सुविधा तसेच योग्य तिकिट आकारणी व स्वच्छता राखण्यावर भर देण्यात यावा, त्याचबरोबर स्थानिक जनतेत स्वच्छतेबद्दल जागृती करावी असेही शिंदे यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
अजिंठा-वेरूळला जागतिक दर्जाच्या सुविधा
By admin | Published: June 25, 2015 1:13 AM