नाशिक : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे येथील स्मारक जागतिक दर्जाचे करण्याच्या दृष्टीने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी नियोजित जागेची पाहणी केली. स्मारक प्रेक्षणीय करण्याबरोबरच ते उद््बोधक असेल, अशा प्रकारची रचना करण्याचा मानस पुरंदरे यांनी व्यक्त केला.नाशिकमध्ये गंगापूररोडवरील पंपिंग स्टेशन येथे इतिहास संशोधन संग्रहालय साकारत असून, त्याच जागेत बाळासाहेबांचे स्मारक साकारण्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केले होते. पुरंदरे यांनी त्यांच्याकडील काही शस्त्रे संग्रहालयासाठी देण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार उभयतांनी सोमवारी इतिहास संग्रहालयाची संयुक्तपाहणी केली. शिवसेनाप्रमुखांचे स्मारक जागतिक दर्जाचे असेल, अशी भावना पुरंदरे यांनी व्यक्त केली. ‘मी अमेरिका, कॅनडासह जगभरातील अनेक संग्रहालये बघितली आहेत, तसेच अद्ययावत स्मारक येथे साकारता येईल. भारतातही जागतिक दर्जाचे स्मारक साकारता येऊ शकते, याची प्रचिती त्यातून मिळेल,’ असे पुरंदरे म्हणाले. ‘वास्तुरचनाकाराबरोबर चर्चा करून स्मारकाच्या आराखड्याचे नियोजन करण्यात येणार आहे,’ असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)राज ठाकरेंकडे दूरदृष्टीराज ठाकरे हे कलासक्त आहेत. महाराष्ट्र घडविण्याची त्यांना दूरदृष्टी आहे. त्यामुळे नाशिकमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत यथोचित स्मारक होईल, असा विश्वास पुरंदरे यांनी व्यक्तकेला. संग्रहालयासाठी शिवकालीन शस्त्र देणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. स्मारक परिसरात स्वच्छतेची प्राथमिकता सर्वांनीच पाळली पाहिजे, असेही ते म्हणाले.
नाशिकमध्ये बाळासाहेबांचे जागतिक दर्जाचे स्मारक
By admin | Published: November 17, 2015 2:39 AM