लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तलवारीने जग जिंकणारा कोणीच जग जिंकू शकला नाही, हा इतिहास आहे. त्याउलट विचार, शांती, अहिंसा आणि संस्कारांनी जग निश्चित जिंकता येते. तथागत गौतम बुद्धांच्या याच विचारांची आज देशासह साऱ्या जगाला आवश्यकता असून जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा आहे, असे विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गेट वे आॅफ इंडिया येथे आयोजित विश्वशांती परिषदेचे उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांच्यासह राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले श्रीलंकेच्या राजदूत सरोजा सिरीसेना, थायलंडचे राजदूत एकापोल पोलपीपट आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, एके काळी दहशतवादी हल्ल्याचे लक्ष्य बनलेल्या हॉटेल ताजसमोर गेट वे आॅफ इंडियाच्या साक्षीने विश्व शांती परिषदेच्या माध्यमातून शांतीचा संदेश दिला जात आहे, ही विशेष उल्लेखनीय बाब आहे. गौतम बुद्धांच्या विचारांचा अंगिकार सर्वांनीच करणे आज पुन्हा एकदा काळाची गरज आहे. गौतम बुद्धांच्या विचारांच्या स्वीकारानंतरच जपानची प्रगती झाली. चीनमधील ड्युनहाँग बौद्ध लेण्या महाराष्ट्रातील अजिंठा लेण्यांपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आल्या असल्याचा मुख्यमंत्र्यांनी या वेळी विशेष उल्लेख केला. आपले सरकार समतेचे राज्य स्थापित करण्यास कटिबद्ध असून, गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची कास धरूनच यापुढेही काम सुरू ठेवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचे जतन व्हावे, हा या परिषदेचा उद्देश असल्याचे सामाजिक न्यायमंत्री बडोले यांनी प्रास्ताविकात सांगितले. याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि किरण रिजिजू यांचीही भाषणे झाली. बौद्ध भिक्खूंना या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात चिवरदान प्रदान करण्यात आले.
जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा - मुख्यमंत्री
By admin | Published: May 11, 2017 3:14 AM