नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि भारतीय संविधानाची जगभरात असलेली महती कायम राहावी; जगभरात दीक्षाभूमीचे महत्व अधोरेखीत व्हावे, यासाठी दीक्षाभूमीचा जागतिक दर्जाचा विकास करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने ५९वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा गुरुवारी दीक्षाभूमीवर आयोेजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कर्नाटकचे सामाजिक न्यायमंत्री एच. अंजय्या, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, जीवनात एकदा तरी दीक्षाभूमीवर यावे, असे जगभरातील नागरिकांना वाटले पाहिजे, असे सुंदर स्मारक येथे साकारले जाईल. यासाठी जागतिक दर्जाचा मास्टर प्लॅन तयार करून जितकी जागा लागेल आणि जितका निधी लागेल तो शासनातर्फे उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली. स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांनी प्रास्ताविकेत दीक्षाभूमीच्या विकासासाठी जागेचा प्रश्न उपस्थित केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्मारक समितीचे माजी अध्यक्ष दिवंगत रा.सू. गवई यांना आदरांजली वाहण्यात आली.८00 किमीचे बुद्ध सर्कीट - गडकरी२२तथागत गौतम बुद्ध ज्या-ज्या ठिकाणी गेले. ती स्थळे जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रे आहेत. परंतु रस्त्यांच्या सुविधांअभावी पर्यंटकांना अडचण होते. त्यामुळे लुंबीनी (नेपाळ) ते सारनाथ या बुद्ध सर्कीट असलेल्या ८०० किलोमीटरचा रस्ता सिमेंट-काँक्रिटचा करून जगभरातील पर्यटकांसाठी खुला करण्यात येईल, असे नितीन गडकरी म्हणाले. ४ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प २ वर्षात पूर्ण होणार असून येत्या दोन महिन्यांच्या आत कामाचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कर्नाटक सरकारतर्फे दीक्षाभूमीला ५ कोटी कर्नाटक राज्याचे सामाजिक न्यायमंत्री एच. अंजय्या यांनी दीक्षाभूमीच्या विकासासाठी कर्नाटक सरकारतर्फे ५ कोटी रुपये देण्याची घोषणा केली.
दीक्षाभूमी होणार जागतिक दर्जाची
By admin | Published: October 23, 2015 2:01 AM