पुणे : सध्या विषाणूजन्य आजारांनी जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. हिपॅटायटिस हाही एक विषाणूजन्य आजार आहे. हिपॅटायटिस ए आणि बीसाठी लस उपलब्ध आहे. हिपॅटायटिस ई आणि सीसाठी ही लस विकसित होत आहे. विषाणूजन्य आजारांची चाचणी वेळेत करून घेणे आवश्यक असते. जेणेकरून लवकर उपचार किंवा अन्य प्रतिबंधात्मक पर्यायांबद्दल डॉक्टर मार्गदर्शन करू शकतात. विषाणूजन्य आजारांचे निदान उशिरा झाल्यास गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे सद्यस्थिती पाहता विषाणूजन्य आजारांबाबत जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे. जागतिक हिपॅटायटिस दिनाची यावर्षीची थीम ‘फाइंड द मिसिंग मिलियन्स’ अशी आहे.
सध्या जगात सुमारे २९० दशलक्ष लोक विषाणूजन्य हिपॅटायटिस आजारासोबत जगत आहेत आणि या स्थितीबद्दल ते अनभिज्ञ आहेत. जागतिक हिपॅटायटिस डे दर वर्षी २८ जुलै रोजी साजरा केला जातो. समाजात परिवर्तन घडवून आणण्याच्या दृष्टीने विषाणूजन्य हिपॅटायटिसच्या जागतिक समस्येबद्दल जागरूकता निर्माण करणे, हा यामागील हेतू आहे.
हेपेटोट्रॉपिक विषाणूचे दोन प्रकार आहेत. हिपॅटायटिस ए आणि ई हा पाण्यातून होणारा संसर्ग आहे. हिपॅटायटिस बी आणि सी हे संक्रमित व्यक्तीच्या रक्त किंवा शरीरातील द्रव पदार्थाच्या संपर्काद्वारे पसरतो. हिपॅटायटिस ए हे या आजाराचे सामान्य कारण आहे, दुषित अन्न आणि पाणी सेवन केल्याने हा पसरतो. पाण्यातून पसरणाऱ्या हिपॅटायटिससाठी तो सहसा जबाबदार असतो. दूषित पिण्याच्या पाण्यामुळे पसरणारा हिपॅटायटिस ईमुळे भारतात बऱ्याच प्रमाणात उद्रेक झाला आहे. गरोदरपणात तो गंभीर होऊ शकतो आणि यामुळे यकृतही निष्क्रीय होऊ शकते. ए आणि ई विषाणूमुळे झालेल्या हिपॅटायटिसवर विषाणूविरोधी उपचार असल्यामुळे त्यात काहीसा आधार मिळतो. मात्र काही गंभीर रुग्णांना हॉस्पिटलायझेशनची गरज पडते. हिपॅटायटिस बी आणि सी हा दुषित रक्त आणि शरीरातील द्रव्याच्या संपर्कात आल्याने होतो. हे सायलेंट विषाणू असतात. त्यांच्यामुळे यकृताला झालेली इजा दुर्लक्षित होऊ शकते, अशी माहिती हेपेटालॉजिस्ट, गॅस्ट्रोंटेरॉलॉजिस्ट डॉ. पवन हंचनाळे यांनी दिली.
कोणत्याही शस्त्रक्रियेपूर्वी किंवा आरोग्य तपासणी करण्यापूर्वी रूग्णांच्या स्क्रीनिंग टेस्ट करताना बहुतांश बी आणि सी हिपॅटायटिसचे रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णाला यकृताचा गंभीर आजार (सिरॉसिस) किंवा यकृताचा कर्करोग होतो, तेव्हा बऱ्याचदा या आजाराचे निदान होते. यकृत सिरॉसिस एकदा वाढल्यावर तो कमी करता येत नाही. कावीळ किंवा जलोदरसारखी गुंतागुंत झाल्यास यकृत प्रत्यारोपणाची गरज भासते. हिपॅटायटिस बी आणि सी मुळे होणाऱ्या यकृताच्या कर्करोगारचे निदान बरेच वेळा उशीरा किंवा गंभीर अवस्थेत होते. यावेळी फक्त यकृत प्रत्यारोपणाचा पर्याय शिल्लक उरतो, असे वैद्यकतज्ञांचे म्हणणे आहे.
-------
सध्या हिपॅटायटिस बी आणि सीवरील उपचारासाठी चांगली अँटीव्हायरल औषधे उपलब्ध आहेत. ९५% हिपॅटायटिस सी रुग्णांमधील आजार बरा होतो, तर हिपॅटायटिस बीमधील गुंतगुंत थांबवून त्याचे प्रमाण नियंत्रित करता येते. हिपॅटायटिस बीच्या सर्वच रुग्णांना उपचारांची गरज पडत नाही. त्यामुळे नियमित तपासणी आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे सुचवता येईल. अॅक्युट लिव्हर फेल्युअर (एएलएफ) ही आपत्कालीन वैद्यकीय स्थिती असून त्यात यकृत एकाएकी बिघडते. हिपॅटायटिस ए, बी आणि ईमुळे हा त्रास शकतो. त्या रुग्णांना यकृत आयसीयू युनिटमध्ये विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच आपत्कालीन यकृत प्रत्यारोपण करावे लागते
- डॉ. पवन हंचनाळे, जठरांत्र व यकृत रोग विशेषज्ञ, ज्युपिटर हॉस्पिटल