२८ जुलै आजचा दिवस 'जागतिक हेपेटायटिस दिन' म्हणून साजरा केला जातो. यावर्षी हेपेटायटिसमुक्त निरोगी आरोग्य जगा हे सूत्र आहे. त्यामुळे यदिनानिमित्त हेपेटायटिस या आजाराशी कसे तोंड द्यावे आणि आनंदी राहत निरोगी आयुष्य कसे जगायचे हे जाणून घ्या....
हिपॅटायटीस म्हणजे यकृताचा दाह. हा आजार हिपॅटायटीस विषाणू ए, बी, सी, डी आणि इ यांच्यामुळे व इतरही काही कारणांमुळे होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार, जगभरात ३२.५ कोटी जणांना हिपॅटायटीस ‘बी’ व ‘सी’ यांची बाधा झालेली असून दरवर्षी १३ लाखांहून अधिक रुग्णांचा यामुळे मृत्यू होतो. भारतात ४ कोटी नागरिक ‘हिपॅटायटीस बी’ या विषाणूमुळे बाधित आहेत आणि ६० ते १२० लाख नागरिक ‘हिपॅटायटीस सी’ विषाणूने ग्रस्त आहेत.
गंभीर चिंतेची बाब अशी, की यातील केवळ २० टक्के रुग्णांना तपासण्या व उपचार मिळू शकतात व या आजाराला प्रतिबंध कसा घालायचा हे त्यांना माहीत आहे. जगातील २९ कोटी लोकांना या विषाणूंचा संसर्ग झाल्याची जाणीवही नाही. त्यामुळेच आरोग्य जनजागृती मोहिमांच्या माध्यमातून हे लाखो छुपे रुग्ण शोधून काढावे लागणार आहे. त्यातून या छुप्या रुग्णांना योग्य ते उपचार देता येतील व त्यांचा होणारा त्रास कमी करता येईल.
२०२० मधील ‘जागतिक हिपॅटायटीस दिना’ची संकल्पना आहे. त्या दृष्टीने या आजाराचे स्वरूप, त्याला आळा घालण्याची पद्धत आणि उपचार यांविषयी माहिती करून घेणे महत्त्वाचे ठरते. हिपॅटायटीस ‘ए’ आणि ‘इ’ यांचा संसर्ग मर्यादीत स्वरुपातच होतो व तो इतर विषाणूंप्रमाणे जास्त तीव्र नसतो.
‘हिपॅटायटीस’ मध्ये होणाऱ्या मृत्युंसाठी प्रामुख्याने ‘बी’ आणि ‘सी’ हे विषाणू अधिक कारणीभूत असतात. या दोन विषाणुंमुळे रुग्णांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होते आणि याच दोहोंमुळे यकृताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन लिव्हर सिरॉसिस, लिव्हर फेल्युअर, लिव्हर कॅन्सर हे गंभीर रोग होतात व रुग्ण मरणाच्या दारात जातो. ‘हिपॅटायटीस डी’ या विषाणूचा संसर्ग ‘बी’ या विषाणूच्या बरोबरच होतो. हिपॅटायटीस ‘बी’ व ‘सी’ या विषाणूंनी भारतात मोठेच थैमान घातले आहे, हे आकडेवारीवरून स्पष्ट दिसते.
भूक मंदावणे, अंगावरील त्वचा आणि डोळे पिवळे होणे (कावीळ), शौचाचा रंग फिकट व मूत्राचा रंग गडद असणे, पोटात दुखणे, सांधे दुखणे, थकवा, अचानक वजन कमी होणे, ताप, मळमळ, उलट्या ही हिपॅटायटीस ‘बी’ व ‘सी’ च्या संसर्गाची लक्षणे आहेत. या सामान्यपणे दिसणाऱ्या लक्षणांबरोबरच, काही वेळा यकृत खराब झाल्यावरच दिसणारीही काही लक्षणे असतात. हिपॅटायटीस ए, बी आणि इ यांची बाधा झालेल्या काही रुग्णांची प्रकृती अचानक खालावते. त्यांना तीव्रपणे कावीळ होऊन चक्कर येते व ते कोमामध्ये जातात. त्यांच्या यकृतामध्ये तीव्र स्वरुपाचा बिघाड झालेला असतो. अनेकदा, हिपॅटायटीस ‘बी’ वा ‘सी’ यांची लागण झालेल्या रुग्णांमध्ये लक्षणे दिसत नाहीत. जेव्हा ती दिसू लागतात, तेव्हा त्यांचे यकृत ८० टक्के खराब झालेले असते.
हिपॅटायटीस ‘बी’ व ‘सी’ मुळे लिव्हर सिरॉसिस झालेल्या रुग्णांना कावीळ, पोटात पाणी, आतड्यातून व गुदद्वारातून रक्त पडणे, रक्त साकळण्यात अडथळे येणे, तसेच यकृत खराब झाल्यामुळे मेंदू, मूत्रपिंड व फुफ्फुस यांच्यावर परिणाम होणे ही लक्षणे दिसतात. हिपॅटायटीस होऊ शकणाऱ्यांनी या लक्षणांसंबंधी माहिती घेऊन वैद्यकीय चाचण्या करून घेण्याने ‘हिपॅटायटीस’ला आपण आळा घालू शकतो. या चाचण्यांमध्ये शारिरीक तपासण्या, यकृताच्या कार्याची चाचणी आणि रक्ताच्या चाचण्या असतात. त्यांतू न रुग्णाच्या शरिरात कोणत्या प्रकारचा विषाणू किती प्रमाणात आहे, हे जाणून घेता येते.
एकदा सर्व तपासण्या व निदान झाल्यावर, विषाणूचा संसर्ग तीव्र आहे की सौम्य, यावर उपचारपद्धती ठरविता येते. सध्याच्या काळात, अशा चाचण्या व औषधोपचार त्वरीत करणेच हिताचे ठरणार आहे, कारण ‘हिपॅटायटीस’ची लक्षणे ही ‘कोविड-१९’ची लागण होण्यास पूरक ठरू शकतात. यासाठीच मोहिमा, उपक्रम आणि चर्चा यांच्या माध्यमातून जनजागृती मोठ्या प्रमाणावर करायला हवी. त्यातून माहितीचा प्रसार होऊन हिपॅटायटीस आजाराचा समाजाला लागलेला कलंक कमी होण्यास मदत होईल. जनजागृतीमुळे लोक तपासण्या करून घेण्यासाठी अधिक संख्येने पुढे येतील व त्यांचे लवकर निदान होऊन उपचार पद्धती लवकर सुरू करता येईल.
हिपॅटायटीस ‘बी’ व ‘सी’ हे जुनाट आजार असले, तरी त्यांच्यावर अॅंटीव्हायरल स्वरुपाचे उपचार आहेत. हिपॅटायटीस ‘बी’ व ‘सी’ यांची जुनी लागण असलेल्या रुग्णांनी आपली सतत तपासणी करून घेत राहणे मह्त्त्वाचे आहे, कारण त्यांना यकृताचा कर्करोग होण्याची जोखीम जास्त असते. सर्व नवजात बालकांना ‘हिपॅटायटीस बी’ ची लस देण्याची शिफारस ‘सीडीसी’ ने केलेली आहे. ज्यांना ‘हिपॅटायटीस बी’ चा संसर्ग होण्याची शक्यता असेल, त्या प्रौढांनीदेखील त्याची लस टोचून घेणे श्रेयस्कर आहे. आजाराला आळा घालण्याच्या दृष्टीने ते फार महत्त्वाचे आहे. ‘हिपॅटायटीस सी’ या विषाणूवर आता अॅंटीव्हायरल औषधे उपलब्ध आहेत. त्यामुळे तो बरा होऊ शकतो. दिलेली औषधे नियमित घेण्याबरोबरच संबंधित रुग्णांनी स्वच्छतेचे नियम कसोशीने पाळणे आवश्यक आहे. त्यामुळे इतरांना संसर्ग होणार नाही.
थोडक्यात, हिपॅटायटीस सुप्त स्वरुपात असणारे छुपे लाखो रुग्ण शोधून काढायचे असल्यास, जनतेमध्ये शिक्षण व जनजागृती गरजेची आहे. अशा छुप्या रुग्णांचा तपास लावून त्यांना योग्य ते औषधोपचार दिले व त्यांची काळजी घेतली, तर अशा रुग्णांची संख्या कमी करणे आपणास शक्य होईल. त्यातून या विषाणूंचा धोका कमी करून ‘हिपॅटायटीस-मुक्त’ भारताचे स्वप्न साकारणेही शक्य होईल.