पुणे : तंत्रज्ञानाची प्रचंड माहिती असलेल्या तरुणाईच्या बेफिकिरीमुळे सायबर क्राईमचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्याचा फटका तांत्रिकदृष्या फारसे सक्षम नसलेल्यांना सोसावा लागत आहे. शहरात दररोज तब्बल १५ ते 20 सायबर क्रॉईम होत असून या गुन्ह्यात सर्वाधिक प्रमाण डेबीट, क्रेडीट आणि एटीएम कार्डच्या माध्यमातून होणा-या फसवणुकीचे आहे. त्याची आकडेवारी जवळपास ७५ ते 80 टक्क्यांच्या घरात आहेत.
इंटरनेटच्या माध्यमातून बँकेच्या आर्थिक व्यवहारांमध्ये अफरातफर करणे, क्रेडिट, डेबिट कार्डमधून पैसे पळवणे केवळ या पुरतेच सायबर गुन्हेगार थांबले नसून आता डेटा सेक्युरिटी ब्रेक करुन एखाद्या कंपनीतील उत्पादन, संशोधनाशी संबंधित डेटा चोरणा-यांच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. याशिवाय आॅनलाईन डिफर्मेशनच्या केसेस कोर्टात सुरु असल्याचे सायबरतज्ञ अँड.रोनक व्हनकळस सांगतात. ते म्हणाले, सायबर क्राईममध्ये सर्वाधिक संख्या ही तरुणाईची आहे. ज्यांना फसवणूकीला सामोरे जावे लागले आहे ते बहुतांशी ज्येष्ठ आहेत. तसेच तंत्रज्ञानाची फारशी माहिती नसणारे काही युवक देखील आहेत. सध्या डुप्लिकेट अँप्लिकेशन तयार करुन लुबाडणा-यांची संख्या वाढली आहे. याप्रकारचे अनेक केसेस कोर्टात दाखल होत आहेत. मागील 15 ते 20 दिवसांपासून कोर्टात बनावट अँप्लिकेशनसंबंधीच्या तक्रारी घेवून घेणा-यांच्या संख्येत वाढ झाली आहे. डुप्लिेकट अँप बनुन त्यात ग्राहकाच्या बँकेची, त्याच्या खात्याची इत्यंभुत माहिती गोळा केली जाते. ग्राहकाला ओटीपी, पासवर्ड विचारुन त्याची दिशाभुल केली जाते. तंत्रज्ञानाची फारशी माहिती नसणा-यांच्या हे तात्काळ लक्षात येत नसल्याने त्यांची फसगत होते.
आजकाल मार्केटींगच्या संदर्भातील रिसर्च डाटा चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक मोठमोठ्या कंपन्यांच्या बाबत हे प्रकार उघडीस आल्यामुळे सायबर क्षेत्रात भीतीचे वातावरण आहे. हा डेटा चोरुन त्याची विक्री दुस-या स्पर्धक कंपन्यांना केली जाते. यामुळे कंपन्यांना देखील आपल्या प्रॉडक्ट रिसर्चविषयीचा डेटा सुरक्षित ठेवणे आव्हानात्मक झाले आहे. कार्ड क्लोनिंग हा देखील गंभीर प्रकार समोर आला असून यातून प्रचंड मोठ्या प्रकारचे नुकसान तक्रारदाराला सोसावे लागत आहे. यात आर्श्चयाची बाब म्हणजे तक्रारदार पुण्यात असून त्याच्या नावाच्या डुप्लिकेट कार्डने गोव्यात पैसे काढण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. आॅनलाईन बँकिंगच्या माध्यमातून कार्ड कस्टमाईज करणे, बँक कोड, कार्ड पासवर्ड कस्टमाईज केला जातो. आणि मग पैसे काढले जातात. पहिल्याच प्रयत्नात आरोपी यात यशस्वी होतो असे नाही. मात्र मागील काही दिवसांपासून कार्ड क्लोनिंगव्दारे फसवणूकीने अनेकांची झोप उडवली आहे.
रिस्पॉन्स टाईम फार स्लो आहे : ज्यावेळी एखाद्या सायबर गुन्हयाच्या माध्यमातून पैसे चोरीला जातात तेव्हा बँकेत फोन केल्यानंतर ते सुरुवातीला तुमच्या भाषेसाठी योग्य पर्याय निवडा, कार्डविषयी तक्रार करायची झाल्यास अमुक पर्याय निवडा, त्यानंतर आमच्या अधिका-याशी बोलण्याकरिता तमुक पर्याय निवडा. असे सांगण्यात येते. प्रत्यक्षात संबंधित बँकेंच्या अधिका-याशी बोलण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागते. यासगळ्यात अकाऊंटमधील रक्कम लंपास झालेली असते. अशी उदाहरणे पाहवयास मिळत असल्याची माहिती रोनक देतात.