पुणे : डिजीटल इंडिया म्हणून गेल्या काही वर्षांपासून बराच बोलबाला झालेल्या देशात इंटरनेटच्या विविध समस्या आहेत. सध्या मोबाईलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर इंटरनेटचा वापर होत असून अनेक कंपन्या ’’ फास्ट नेट स्पीड’’ च्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करीत आहेत. दुसरीकडे भौगोलिक क्षेत्राची मर्यादा, त्यातील लोकसंख्येची घनता यासगळ्या पुरेशा संख्येने टॉवर नसल्याने ग्राहकांना बँडविडथ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. कॉल ड्रॉपचे प्रमाण अद्याप आटोक्यात नाही.
पाश्चिमात्य देशात 5 आणि 6 जी टप्पा ओलांडला असताना भारतात मात्र अनेक ठिकाणी इंटरनेटच्या बाबत अडथळयांना तोंड द्यावे लागत आहे. विविध सर्व्हिस प्रोव्हायडरकडून टॉवर उभारले न गेल्याने ग्राहकांना इंटरनेटकरिता समस्येला सामोरे जावे लागते. भारतात 50 टक्यांपेक्षा भौगोलिक अधिक भाग असा आहे कि ज्याठिकाणी लोकसंख्या फारच विरळ आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास राजस्थानमधील वाळवंटी भागात कमी संख्येने लोक राहतात. तर शहरी भागातील एक चौ.कि.मी जागेत किमान पन्नास ते साठ हजार लोक राहतात. याचा परिणाम आपल्याला मिळणा-या इंटरनेटच्या सुविधेवर होताना दिसत असल्याचे संगणकतज्ञ डॉ.दिपक शिकारपुर सांगतात. याला तांत्रिक भाषेत ‘‘टेलि डेन्सिटी’’ असे म्हणतात. परदेशात हेच प्रमाण पाच ते दहा हजारांच्या घरात आहे. आपल्याकडे संगणकाच्या तुलनेत मोबाईलवर सर्वाधिक संख्येने नेट सर्फिंग होते. संख्येच्या गुणोत्तराने मिळणा-या नेट सुविधेकडे पाहिल्यास त्यातील फोलपणा दिसून येतो. आक र्षक जाहिरात करुन ग्राहकांचे लक्ष वेधून घेणे, त्यातून ग्राहकांच्या माथी कमी पैशांत जास्त नेट पँकेज देण्याचे आश्वासन देणे यामुळे शेवटी ग्राहकांना त्याचा तोटा सहन करावा लागतो.
एकीकडे नेटसाक्षरता, त्याचे प्रमान वाढीस लागले असताना दुस-या बाजुला नेट सर्विसिंगच्या दृष्टीने वेगवेगळ्या पातळ्यांवर बदल होण्याची गरज आहे. सध्या बाजारात वायमँक्स नावाच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हाय स्पीड बँडविडथ पोहचविली जाते. दरदिवशी माहिती तंत्रज्ञानाच्या युगात नवीन यंत्राची, त्याच्यातील अत्याधुनिकतेची भर पडत असली तरी प्रत्यक्षात ’’ग्राऊंड लेव्हल’’ त्याचा होणा-या वापराविषयी उदासीनता आहे. आज अन्न,वस्त्र,निवारा याबरोबरच ‘‘इंटरनेट’’ ही देखील काळाची गरज बनली असताना इंटरनेट सेवा देणा-या कंपन्यांकडून जलदगतीने इंटरनेटचा पुरवठा शंकास्पद आहे.
- कॉल डॉप होणे, चांगल्या गुणवत्तेचे इंटरनेट असणार का आणि ‘‘नेटवर्क जँम’’ ही प्रमुख भारतातील इंटरनेट समोरील आव्हाने आहेत. रस्त्या उपलब्ध नसल्यास इतर रस्त्यांवर वाहतूकीचा ताण येवून तेथे वाहतूक कोंडी होते. हेच तत्व इंटरनेटला देखील लागु आहे. जास्तीत जास्त संख्येने टॉवरची उभारणी त्यासाठी पर्याय आहे.
- इंटरनेटचे प्रस्थ वाढत असताना दुसरीकडे त्यावर काय प्रसिध्द करायचे, काय वगळायचे यावर कुणाचीच ‘‘सेंसॉरशिप’’ नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे माहितीची देवाण घेवाण न होता गंभीर धोके संभवतात. हँकिंग हा देखील इंटरनेट विश्वात खळबळ उडाल्याने त्यापासून सरंक्षणाचे देखील आव्हान अनेक कंपन्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांंपुढे देखील असल्याचे शिकारपुर सांगतात.