पुणे : अन्याय फक्त स्त्रीवर होतो आणि तिलाच मानसिक आधाराची गरज असते या ठराविक मांडणीतून बाहेर येऊन पुरुषावर होण्याऱ्या अन्यायाचीही तितक्याच संवेदनशीलपणे नोंद घेण्याची गरज असल्याचे मत जागतिक पुरुष दिनानिमित्त व्यक्त केले जात आहे.
१९ नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण जगभरात पुरुष हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने सगळ्या पुरुषांना एकाच तराजूत न तोलता माणूस म्हणून बघण्याची गरज असल्याचे विचार पुरुष हक्क संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहेत. मागील पिढीत स्त्रियांवर असणारी बंधने आणि बंदिस्त समाजव्यवस्था यामुळे त्यांच्यावर अधिक अन्याय होत होता. तो अजूनही पूर्णपणे थांबलेला नाही. पण म्हणून मोकळ्या वातावरणात आणि सर्व क्षेत्रात पुढे जाणाऱ्या स्त्रियांमागे खंबीरपणे उभं राहणाऱ्या पुरुषांचे कौतुक होणारचं नाही का असा सवालही तज्ज्ञ विचारतात.
एकीकडे धावती लाईफस्टाईल, वाढती स्पर्धा, त्यातून येणारे नैराश्य, विभक्त कुटुंबपद्धती, वाढलेल्या सोशल मीडियाचा वापर आणि कमी झालेला संवाद यामुळे दाम्पत्यांमध्ये वाद वाढून वैवाहिक जीवन अडचणीत येत आहे. अशावेळीही अनेकदा फक्त पुरुषाला जबाबदार धरलं जाण्याची उदाहरणंही बघितली जातात.पुरुष हक्क संरक्षण समितीचे पुणे व रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष ऍड संतोष शिंदे म्हणाले की,'मुळात सर्व पुरुष किंवा स्त्रिया निर्दोष नाहीतच पण फक्त तो पुरुष आहे म्हणून काहीही जाणून न घेता त्याला संशयित म्हणून बघणे चुकीचे आहे, यामुळे कुटुंबव्यवस्था धोक्यात येताना दिसत आहे. शहरात घडणाऱ्या उदाहरणांपैकी बोलायचे झाल्यास दोघांच्या जाडजूड पगारामुळे अतिआत्मविश्वास आणि हट्टीपणा यांच्यातून विसंवाद वाढतो. बरेचसे कायदे स्त्रियांच्या बाजूने असल्यामुळे अशावेळी त्यांचाही दुरुपयोग करून नवऱ्याला आणि कुटुंबियांना अडचणीत आणण्याची उदाहरणे नवीन नाहीत'. अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष शिवाजी कारळे म्हणाले की, 'आय टी क्षेत्र किंवा सुशिक्षित दांपत्य ज्या सहजपणे घटस्फोटाचा पर्याय स्वीकारतात ते धक्कादायक आहे. त्यावेळी अनेकदा महिलांकडून तडजोड न करण्याचा किंवा नातं न जोडण्याचा ठामपणा अधिक दिसून येतो.'
पुरुषांच्या आत्महत्या अधिकच !
'अरे तू पुरुष आहेस ना, पुरुषासारखा पुरुष तू बांगड्या भर, अरे रडायला तू काय बाई आहेस का' अशा शब्दांनी अक्षरशः हिणवून आणि मानसिक आधार देण्याऐवजी खच्चीकरण झाल्याने आजही भारतात पुरुषांच्या आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे. २०१६सालच्या आकडेवारीनुसार भारतात ६५ हजार पुरुषांनी तर ३५ हजार स्त्रियांनी आत्महत्या केल्या असल्याचा हवाला कारळे यांनी दिला आहे.