पुणे : पंजाबी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी पुण्यात विश्व पंजाबी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. गुरू गोविंदसिंग यांच्या ३५०व्या जयंतीचे औैचित्य साधून सरहद संस्थेच्या वतीने १८ ते २० नोव्हेंबरदरम्यान हे तीन दिवसीय संमेलन पार पडेल, अशी माहिती सरहदचे संजय नहार यांनी पत्रकार परिषदेत दिली. संमेलनाध्यक्षपदासाठी पंजाबातील ज्येष्ठ साहित्यिक सुरजितसिंग पाथर यांच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. घुमान येथे झालेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्रात पंजाबी भाषेचे संमेलन घेण्याची सूचना केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी त्याला अनुमोदन दिले होते. याच घोषणेचा भाग म्हणून पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या पाठिंब्याने गुरू गोविंदसिंग यांच्या ३५०व्या जयंतीनिमित्त हे संमेलन पुण्यात आयोजित करण्याचा निर्णय सरहद संस्थेच्या वतीने घेण्यात आला. गुरू अर्जुनदेव यांच्या शहीद दिनानिमित्त संमेलनाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. या वेळी भारत देसडला, संयोजन समितीचे संतसिंग मोखा, आर. पी. एस. सेहगल आदी उपस्थित होते. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल तसेच पंजाबी साहित्य अकादमीच्या सहकार्याने कार्यक्रमांची आखणी करण्यात येणार आहे. संमेलनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, प्रकाशसिंग बादल, नितीशकुमार, तसेच जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.नहार म्हणाले, ‘‘या संमेलनात पंजाबी भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, नाटककार, कवी, लेखक तसेच रसिक सहभागी होणार आहेत. विश्व पंजाबी साहित्य संमेलनामध्ये मराठी साहित्यिकांचाही लक्षणीय सहभाग असेल.‘‘ओडिशा, बिहार, कर्नाटक, नांदेड, दिल्ली तसेच परदेशातूनही ५००-१००० साहित्यप्रेमी संमेलनाला हजेरी लावण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.’’(प्रतिनिधी)>पुण्यातील गणेश कला क्रीडा केंद्र येथे १८ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता या संमेलनाचे उद्घाटन होईल. पुढील तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद, प्रकट मुलाखत, अध्यक्षीय भाषण, अनुवादित पुस्तकांचे प्रदर्शन असे कार्यक्रम पार पडतील. दि. २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत संमेलनाचा समारोप होणार आहे.
विश्व पंजाबी साहित्य संमेलन पुण्यात!
By admin | Published: June 09, 2016 1:04 AM