मुंबई : यंदा २१ जूनला प्रथमच साजऱ्या झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या स्मृती ताज्या असतानाच योग शिक्षकांच्या कौशल्याला जागतिक मान्यता देण्याच्या दृष्टीने केंद्रीय आयुष मंत्रालयाने पुढचे पाऊल टाकले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वीकारार्ह ठरेल, असे प्रमाणपत्र देण्याची रीतसर व्यवस्था नव्याने निर्माण करण्यात आली आहे. ते मिळविणाऱ्या देशभरातील पहिल्या तुकडीत महाराष्ट्रातील आठ निष्णात योग शिक्षकांचा समावेश आहे. आयुष मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने योगविद्येतील क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडियाने रीतसर परीक्षा घेऊन योग शिक्षकांना उचित प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था केली आहे. यापूर्वी योग शिक्षकांच्या कौशल्यावर अशी राष्ट्रीय मान्यतेची मोहर उमटविण्याची व्यवस्था नव्हती. ती झाल्याने हे प्रमाणपत्र मिळविणाऱ्या योग शिक्षकांना इतर देशांमध्ये योग शिक्षणाचे व प्रसाराचे काम करणे सोपे झाले आहे. योग शिक्षणातील थेरपी तसेच गीता, उपनिषदे आणि योगसूत्र (पतंजली) यातील सैद्धांतिक मांडणीचे आकलन आणि योगविद्या शिकविण्यातील नैपुण्य अशा तीनही अंगांचे साकल्याने मूल्यमापन करणारी परीक्षा घेऊन प्रमाणपत्र देणारी पर्याप्त निरीक्षण यंत्रणा योग शिक्षकांसाठी वरदान ठरणार आहे. या यंत्रणेमार्फत नुकतीच झालेली पहिली परीक्षा देणाऱ्या महाराष्ट्रातील १४ पैकी आठ शिक्षक यशस्वीरीत्या प्रमाणपत्राचे मानकरी ठरले आहेत. हे परीक्षार्थी प्रामुख्याने मुंबई, पुणे आणि नाशिकमधील होते. यशस्वी योगशिक्षकांमध्ये संध्या पत्की, पी. ऋषिकेशन, डॉ. सीमा जोशी, प्रीतीश अमोलिक, अंकिता सूद, दिती व्होरा आणि फाल्गुनी यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
योग शिक्षकांना जागतिक मान्यता
By admin | Published: August 29, 2015 2:38 AM