पुणे : प्रेमात अपयश...शाळेच्या परीक्षेत मार्क कमी पडणं..एकटेपणा ..कुटुंबीयांकडून होणारा छळ किंवा दुर्लक्ष...न्यूनगंड...या गोष्टींचा सामना करावा लागला की सर्वप्रथम डोक्यात एकच विचार येतो तो म्हणजे ‘आत्महत्येचा’! ती व्यक्ती मानसिक ताणतणावात असणं हेच त्यामागचं प्रमुख कारण असतं. अशावेळी त्यांचं म्हणणं ऐकून घेणं एवढचं त्या व्यक्तीसाठी पुरेसं असतं. कोणतेही सल्ले, सूचना किंवा जजमेंटल न होता त्यांचं म्हणणं ऐकून घेत अशा व्यक्तींना आत्महत्येपासून परावृत्त करण्यामध्ये एक स्वयंसेवी संस्था यशस्वी ठरली आहे त्या संस्थेचे नाव आहे कनेक्टिंग! गेल्या चौदा वर्षांमध्ये संस्थेने केवळ हेल्पलाईनद्वारे ‘अॅक्टिव्ह लिसनर’च्या भूमिकेतून राज्यासह बाहेरील राज्यांमधील जवळपास २५ हजार लोकांना आत्महत्येपासून परावृत्त केले आहे. आत्महत्येच्या विचारात अडकलेल्या माणसांना मानसिक आधार देण्याचे काम ही संस्था करीत असून, निराशेच्या गर्तेत ओढल्या गेलेल्यांसाठी ही संस्था आशेचा किरण बनली आहे. संस्थेचे स्वयंसेवक ‘आत्महत्या प्रतिबंधा’साठी काम करीत आहेत. उद्याच्या (१० सप्टेंबर) जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त जागतिक आत्महत्या प्रतिबंध संघटनेने ‘आत्महत्या रोखण्यासाठी एकत्रित काम करूयात’ अशी घोषणा दिली आहे. यापार्श्वभूमीवर संस्थेचे स्वयंसेवक विरेन राजपूत यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. ते म्हणाले, आत्महत्येचा विचार करणारी व्यक्ती ही प्रचंड नैराश्यात असते. निराशेची भावना बळावली की व्यक्ती स्वत:ला इजा करून घेण्याची शक्यता असते, तर काहीवेळा आत्महत्येचे पाऊल उचलू शकते. एनएसबीआरच्या (राष्ट्रीय गुन्हेगारी वार्षिक अहवाल २०१५) नुसार भारतात आत्महत्या समस्येत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक येतो. 18 ते ४५वयोगटांतील व्यक्तींचे प्रमाण अधिक आहे. संस्थेतर्फे रोज बारा ते आठ या वेळेत ९९२२००४३०५ या क्रमांकावर हेल्पलाईन सुरू आहे. दररोज या हेल्पलाईनवर १० ते १२ कॉल्स येतात. आत्महत्येचे विचार मनात असणाºया लोकांना खूपकाही सांगायचं असतं. पण त्यांचं ऐकून घेणारं कोणी नसतं. अशावेळी त्यांना मार्गदर्शनाची गरज असते. लोकांचं ऐकून घेण्यासाठी एक सहनशीलता हवी असते, त्याकरिता ४0 स्वयंसेवकांना ७५ तासांचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. संस्थेने चौदा वर्षांत २५ हजारांहून अधिक कॉल स्वीकारले असून, व्यक्तींना आत्मघातकी विचारांपासून प्रवृत्त करण्यात यश मिळविले आहे. संस्था आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी ‘सुसाईड सर्व्हायवर सपोर्ट ग्रुप’, शालेय मुलांसाठी ‘पीअर एज्युकेटर्स प्रोग्रॅम’, वस्तीतील लोकांसाठी ‘कम्युनिटी कौंंंन्सिलिंग असे अनेक उपक्रम राबविते. सध्या संस्थेत १३३ स्वयंसेवक आणि ८ मार्गदर्शक आहेत. निराश मनाला उभारी देण्याचे काम ‘कनेक्टिंग’ करत आहेच, पण यानिमित्ताने सर्वांनी सहभाग नोंदविल्यास आपल्या आसपासच्या कमकुवत मनाच्या व्यक्तीचे आयुष्यमान नक्कीच वाढू शकेल.
............* कोणती काळजी घ्यावी?तणावग्रस्त व्यक्तीचे म्हणणे आपुलकीने ऐकावे.मानसोपचार तज्ज्ञ, डॉक्टर समुपदेशक यांची मदत घ्यावी.आत्महत्या रोखण्यासाठी कार्यरत हेल्पलाईनवर संपर्क करावा..............
* आत्महत्येची लक्षणेमृत्यू किंवा आत्महत्येविषयी विचार करणे किंवा लिहिणे.निराश, हतबलता अथवा किंमत नसल्याची भावना बोलून दाखविणे.चिंताग्रस्त, संतापलेपणा, सत्तत बदलणारा मूड किंवा बेफिकिरीनिरोपाची भाषा, अमली पदार्थाचे सेवन.
.....................
अभ्यासातही हुशार नाही, दिसायलाही फारशी खास नाही. त्यामुळे महाविद्यालयात माझ्याकडं कुणी पाहायचं देखील नाही. मनात एक न्यूनगंड आला होता. एकप्रकारचा एकटेपणा आला होता. स्वभाव देखील चिडचिडा बनला होता. घरातून निघून जावं किंवा आत्महत्या करावी असं सारख वाटायचं. मग, हेल्पलाईनवर संपर्क साधला आणि त्यांनी सगळं ऐकून घेतलं. मला खूप बरं वाटलं. ‘कनेक्टिंग’चे मनापासून आभार. - तरुणी......