पुणे : सोलो ट्रॅव्हलिंग अर्थात एकट्याने फिरण्याची किंवा प्रवास करण्याची फॅशन सध्या रूढ होत चालली आहे. रुटीनमधून बदल हवा असेल आणि स्वतःला भरपूर वेळ द्यायचा असेल तर हा पर्याय उत्तम आहे. अर्थात प्रत्येक गोष्टीवर काही फायदेशीर आणि काही हानिकारक परिणाम होण्याची शक्यता असतेच. तशाच शक्यता इथेही असल्या तरी प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी हा अनुभव घ्यायला हवा.
यासाठी एकट्याने फिरण्याचा पर्याय स्वीकारा
बंधनात अडकत नाही : सोबतच्या व्यक्तीला फिरण्याचा मूड नसेल तर अनेकदा आपल्यालाही त्या ठिकाणी जाता येत नाही. अनेकदा सोबतच्या व्यक्तीमुळे हवी ती राईड किंवा खाद्यपदार्थही खाताना बंधने येतात. एकटे असताना मात्र या समस्येशी झुंजावे लागत नाही.
स्वतःला मिळतो वेळ : हल्ली रोजच्या रुटीनमध्ये आपण स्वतःला सोडून सगळ्या जगाला वेळ देत असतो. अशावेळी शांतपणे काही प्रश्नांवर विचार करण्याची, भविष्याची आखणी करण्याची संधी असते.
अनोळखी लोकांशी संवाद होतो : ओळखीच्या व्यक्ती सोबत असताना आपल्याला अनेकदा आजूबाजूच्या व्यक्तिंचा विसर पडतो. आपण एकटेच असलो तर अनेक अनोळखी व्यक्तींशी ओळख होते. त्यामुळे येणाऱ्या चांगल्या- वाईट अनुभवांनी समृद्ध होता येते.
पर्यटन ठिकाण बारकाईने बघता येते : सोबत कोणी नसल्यास नवे ठिकाण मनापासून आणि विनाअडथळा बघता येते. स्वतःला हवे त्या ठिकाणी जास्त वेळ थांबता येते.
ऐनवेळी प्लॅन बदलता येतो : तुम्ही कुटुंबासोबत किंवा मित्रमैत्रिणीसोबत फिरणार असलात तर ऐनवेळी प्लॅन बदलता येत नाही. अनेकदा तुमच्या मनात नसतानाही ठरलेल्या ठिकाणी जावे लागते. एकट्याने फिरताना आपणच मनाचे राजे असतो. त्यामुळे प्लॅन बदलणे शक्य होते.
आत्मविश्वास वाढतो : एकट्याने फिरताना तुम्हाला धिटाई दाखवावी लागते. काहीही घडलं तरी ते स्वीकारून आहे त्या स्थितीत लढावे लागते. त्यामुळे या ट्रिप नंतर तुमचा आत्मविश्वास वाढलेला असतो यात शंका नाही.