मुंबई : डीएनएच्या शोधाने जीवशास्त्राच्या वेगळ्या वाटा जन्माला आल्या. डीएनए निष्क्रिय असतात; पण त्यांना कृतीत आणण्याचे काम रायबोझोम्स करतात. म्हणूनच त्यांना प्रथिनांची निर्मिती करणारा कारखाना असे संबोधले जाते. रायबोझोम्सवर होणारी रासायनिक प्रक्रिया, प्रथिने बनण्याची प्रक्रिया साध्या डोळ्यांनी पाहता येत नाही, त्याकरिता क्रिस्टलोग्राफीची गरज असते, असे मत उपस्थित वैज्ञानिकांनी मांडले. वुमन्स सायन्स काँग्रेसमध्ये रविवारी विद्यापीठात आयोजित केलेल्या कार्यक्रमात विज्ञान क्षेत्रात उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी २००९मध्ये नोबेल पुरस्कार विजेत्या ऐडा ए योनथ या इस्राईलच्या क्रिस्टलोग्राफर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी पी.के. मधू, हनुदत्ता अत्रेय, हिमांशू सिंघ, टी.एस. महेश, सुभाष खुशू आणि पुष्पा मिश्रा उपस्थित होते.पेशींमध्ये संचार करणाऱ्या रायबोझोम्सनी तयार केलेली प्रथिने मुख्यत: पेशींमध्येच वापरली जातात. तर आवरणावर असलेल्या रायबोझोम्सने तयार केलेली प्रथिने पेशींबाहेरही वापरली जातात. हे रायबोझोम्स प्रथिनांची साखळी जोडण्याचे काम करतात. त्यातल्या मोठ्या भागाला ‘६० एस’, तर छोट्या भागाला ‘४० एस’ असे संबोधले जाते़ अशी रायबोझोम्सची दुनिया वैज्ञानिकांनी उलगडली. (प्रतिनिधी)