Vada Pav Day 2022 : "खिशाला परवडणारं पूर्णब्रह्म! स्थळ कुठलंही असो या मेन्यूला तोड नाही"; अमोल कोल्हेंची खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 04:00 PM2022-08-23T16:00:27+5:302022-08-23T16:09:26+5:30
Amol Kolhe And World Vada Pav Day 2022 : अमोल कोल्हे यांनी जागतिक वडापाव दिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुंबईतील, पुण्यातील त्यांच्या आवडत्या वडापावबद्दल लिहिलं आहे.
भूक लागल्यानंतर पटकन काहीतरी खायचं म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे वडापाव. वडापाव आणि चहाशी निगडीत प्रत्येकाच्याच काही आठवणी असतात. आवडीनुसार चटणी, मिरची पावावर घालून बटाटावड्यांचा आनंद घेण्याची मजा काही वेगळीच. खासकरून पावसाळ्यात खूप लोक वडापाव खातात. आज जागतिक जागतिक वडापाव दिन (World Vada Pav Day 2022) सर्वत्र साजरा केला जात आहे. याच दरम्यान अनेकांनी आपल्या वडापावविषयीच्या काही खास आठवणी शेअर केल्या आहेत.
अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी जागतिक वडापाव दिनानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुंबईतील, पुण्यातील त्यांच्या आवडत्या वडापावबद्दल लिहिलं आहे. "खिशाला परवडणारं पूर्णब्रह्म" म्हणत त्यांनी काही आठवणी सांगितल्या आहेत. तसेच स्थळ कुठलंही असो... या मेन्यूला तोड नाही! असंही म्हटलं आहे. अमोल कोल्हे यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याबाबत पोस्ट शेअर केली आहे.
"वडापाव - अनेक आठवणी... शाळेत हट्टाने खाल्लेला गाडीवरचा वडापाव, मग पुण्यात आल्यावर बालगंधर्व रंगमंदिराच्या बाहेर जोशी वडेवाले... आणि मग स्वप्नांचा पाठलाग करत मुंबईत स्थिरावताना कधी धावपळीतला ब्रंच तर कधी खिशाला परवडणारं पूर्णब्रह्म! स्थिरावल्यावर डाएट, वजन, पथ्य याकडे पाहून टाळलेला वडापाव कोणेकाळी आधार होता या विचारानं हसू येतं... रिमझिम पाऊस, गरमागरम वडापाव, तळलेली मिरची आणि फर्मास चहा... स्थळ कुठलंही असो... या मेन्यूला तोड नाही!" असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.