डोंबिवली - डोंबिवलीत अंतरदृष्टी प्रतिष्ठान व्हिजन इन्साईट फाऊंडेशनतर्फे ''जागतिक पांढरी काठी दिन'' साजरा करण्यात आला. फडके रोडवरील मदन ठाकरे चौकापासून आप्पासाहेब दातार चौकापर्यंत दिव्यांग व्यक्तींना रस्त्याने चालताना किंवा ओलांडताना कशी मदत करावी? याचे प्रात्यक्षिक सुमारे 35 दिव्यांग व त्यांच्या मदतनीसांनी सादर केले. त्यानंतर 60 दिव्यांगांसह मोरया हॉल, प्र. के. अत्रे वाचनालय येथे आयोजित केल्या गेलेल्या भव्य कार्यक्रमात भारतातील पहिले अंध जुडो मास्टर श्री जयदीप सिंग यांचा यावेळी स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
जयदीप सिंग यांनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य स्थरातील स्पर्धांमध्ये आतापर्यंत ९ गोल्ड, १ सिल्वर, १ ब्रॉन्झ आणि ब्लॅक बेल्ट होल्डर अशी पारितोषिकं मिळवली आहेत. तसंच सकारात्मक विचार आणि सकारात्मक वृत्तीच्या मदतीने व निसर्गोपचाराच्या माध्यमातून दुर्धर किडनी कॅन्सरवर विजय मिळवून भारतातील निसर्गोपचाराच्या क्षेत्रात डॉक्टरेट मिळवणारे पहिले दिव्यांग श्री सुभाष वारघडे यांचाही यावेळी स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी समाजसेवी संस्थांनी उपस्थित अंध व्यक्तींना घडीच्या पांढऱ्या काठ्यांचे वितरणही केले.