पुणे : समाजातील प्रत्येक घटकाला कायदेविषयक ज्ञान मिळावे, यादृष्टीने सातत्याने कार्यरत असणाऱ्या अभिधा निफाडे हिची जागतिक युवा राजदूत म्हणून निवड करण्यात आली आहे. ‘बीर्इंग लॉजिकल’ या संस्थेच्या माध्यमातून ती कायदा या विषयाबाबत सर्वसामान्यांमध्ये जागृती निर्माण करणाऱ्या अभिधाच्या सामाजिक कार्याची संयुक्त राष्ट्रसंघाने दखल घेत तिची नियुक्ती केली.अभिधा आयएलएस लॉ कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. ती मूळची अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर या गावची रहिवासी. तिचे आई-वडील दोघेही श्रीरामपूर येथे प्राध्यापक म्हणून काम करतात. नगर जिल्ह्यात सातत्याने घडणाऱ्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी ती अस्वस्थ झाली. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना, कारणमीमांसा आदी बाबींचा अभिधाने बारकाईने अभ्यास केला. अभ्यासादरम्यान, महिला आणि शोषितांना कायद्याचे ज्ञान आणि अचूक माहिती नसते, हे तिच्या लक्षात आले. कायद्याविषयी समाजात असलेल्या निरक्षरतेमुळे तिला ‘बीर्इंग लॉजिकल’ या संस्थेची स्थापना करण्याची प्रेरणा मिळाली.अभिधा म्हणते, ‘माझ्या सामाजिक कार्याची सुरुवात पुण्यातील रोशनी या स्वयंसेवी संस्थेबरोबर झाली. महिलांसाठी बचतगट, लहान मुलांसाठी चाइल्ड अॅक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग सेंटर प्रकल्प, तसेच चेन्नई सहायता कॅम्पेन इत्यादी प्रकल्पात मी काम केले आहे. काही काळासाठी मला दलाई लामा फाउंडेशनसह काम करण्याची संधी मिळाली. त्यातूनच गरजूंपर्यंत पोहोचण्याची प्रेरणा मला मिळाली.’जागतिक युवा राजदूत म्हणून काम करत असताना महानगरपालिका शाळांमधील शिक्षणपद्धती जास्तीत जास्त विद्यार्थीभिमुख कशी बनेल, तसेच समाजात कायद्याविषयी जाणीव निर्माण होईल, यादृष्टीने काम करण्याचा अभिधाचा मानस आहे. जास्तीत जास्त मुलींना शिक्षण मिळावे, यासाठी ती प्रयत्नशील राहणार आहे. १ जुलैै २०१६ ते ३१ जून २०१९ या काळात अभिधा निफाडे जागतिक युवा राजदूत म्हणून काम पाहणार आहे. (प्रतिनिधी)
अभिधा निफाडे ठरली जागतिक युवा राजदूत
By admin | Published: August 03, 2016 12:49 AM