संतोष भिसे ।सांगली : राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक नामांकित बुद्धिबळपटूंना घडविणाऱ्या सांगलीत लवकरच जगातील पहिले ‘बुद्धिबळ भवन’ साकारणार आहे. २५ हजार चौरस फुटातील या इमारतीस बुद्धिबळाच्या पटाचे कल्पक स्वरूप दिले आहे. एकाचवेळी पाचशे खेळाडूंच्या लढती, तसेच आंतरराष्ट्रीय सामने येथे होऊ शकतील.
बुद्धिबळाचे भीष्माचार्य भाऊसाहेब पडसलगीकर यांनी १९४१ मध्ये स्थापन केलेल्या नूतन बुद्धिबळ मंडळाला २०१७ मध्ये ७५ वर्षे पूर्ण झाली. मंडळाने बुद्धिबळ विश्वात सांगलीचे नाव कोरले. विश्वविजेता विश्वनाथन् आनंद, ग्रॅण्डमास्टर के. शशीकिरण, पी. हरिकृष्णा, अभिजित कुंटे, बी. अधिबान, राहुल शेट्टी, आर. बंडोपाध्याय, जयंत गोखले, प्रवीण ठिपसे, एन. सुधाकरबाबू आदी खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे सांगली ब्रॅँडिंगसाठी पुढाकार घेतलेल्या तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी जगातील एकमेव बुद्धिबळ भवन उभारण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांनी आराखडा तयार केला असून लवकरच कामासही सुरुवात होणार आहे. ही वास्तू निश्चितच सांगलीच्या वैभवामध्ये भर घालणार आहे.
साडेतीन वर्षात इमारत उभी राहणार
- भवनासाठीचा प्रस्ताव २८ डिसेंबररोजी क्रीडा संचालकांकडे पाठविण्यात आला. मिरजेतील क्रीडा संकुलाच्या जागेत ६ कोटी ५८ लाखांची पाचमजली इमारत प्रस्तावित आहे. वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांनी आराखडा बनवला आहे. कोणत्याही दिशेने पाहिल्यानंतर बुद्धिबळाचा पट दिसेल, अशी रचना आहे. हेलिकॉप्टरमधून खाली पाहिल्यानंतरही बुध्दिबळाचा पट अंथरल्याचे दिसेल. आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी आवश्यक काचेचे सभागृह, डिजिटल स्क्रीन, पे्रक्षागॅलरी, प्रेस रुम, कॅन्टीन, निवास व्यवस्थेचा अंतर्भाव यात आहे. एकाचवेळी ५०० खेळाडू खेळू शकतील. शासनाच्या मंजुरीनंतर साडेतीन वर्षात इमारत उभी राहील.
बुद्धिबळ भवनात : या सुविधा असतील...
- पहिल्या मजल्यावर छोट्या खोल्या, खेळाडू, प्रशिक्षकांसाठी निवास व्यवस्था, भाऊसाहेब आणि नूतन मंडळाशी संबंधित संग्रहालय. दुसऱ्या आणि तिसºया मजल्यावर स्पर्धा सभागृह असेल. चौथ्या मजल्यावरही निवास व्यवस्था आणि कॅन्टीन असेल. सर्वात शेवटच्या पाचव्या मजल्यावर आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी काचेची खोली असेल. हे भवन साकारल्यानंतर जगभरात सांगलीची नवी ओळख निर्माण होईल.
इमारतीमधील प्रत्येक मजल्यास आणि विभागास बुद्धिबळातील प्रचलित नावे दिली आहेत. जगभरातील बुद्धिबळ स्पर्धा सांगलीत बसून पाहता येतील, असे नियोेजन करण्यात आले आहे. येथील स्पर्धांचे प्रक्षेपणही जगभर दाखविता येईल. जगात कुठेही बुद्धिबळाच्या पटावर आधारित रचनात्मक इमारत नाही. त्यामुळे जागतिक स्तरावरील देखणी वास्तू सांगलीत साकारणार आहे.- प्रमोद चौगुले, वास्तुविशारद